नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा दिग्गज सलामीवीर व डावखुरा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन गेल्या काही काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. शिखर धवन जवळपास १० महिन्यांपूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. कोर्टात प्रलंबित असणारे त्याचे घटस्फोटाचे प्रकरण याचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे.शिखर धवनला आता दिल्ली कोर्टाने मोठा दिलासा दिला असून त्याला पत्नी आएशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला आहे. शिखर धवनला पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात होता,हा धवनचा दावा न्यायालयाने मान्य केला आहे.
बऱ्याच काळापासून शिखर धवनच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयाकडे प्रलंबित होते.दिल्लीच्या पतियाला कुटुंब न्यायालयात शिखर धवनने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पत्नीकडून मानसिक त्रास होत असल्याची तक्रार शिखर धवनने आपल्या याचिकेत केली होती. पत्नी आएशा मुखर्जी आपल्याला मुलाला भेटू देत नसल्याचेही शिखर धवनने याचिकेत नमूद केले होते. या सर्व प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाल्यानंंतर न्यायालयाने शिखर धवनला घटस्फोट मंंजूर केला आहे.
शिखर धवन यांच्या पत्नीने त्याला मानसिक त्रास दिला. अनेक वर्षं मुलापासून त्यांना वेगळं ठेवलं. शिखर धवन यांच्या या आरोपांचा त्यांच्या पत्नी आएशा मुखर्जी यांनी कोणताही प्रतिवाद केलेला नाही. त्यामुळे त्यांचे हे सर्व आरोप मान्य करत मानसिक त्रासाच्या मुद्यावर शिखर धवन यांना घटस्फोट मंजूर करण्यात येत आहे, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.
