नागपूर : वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहत आहेत.अजित पवारांनी त्यांचे अनेक नियोजित कार्यक्रमही रद्द केले आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.अशातच अजित पवारांचे सहकारी आणि माजी केंंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या सार्वजनिक कार्यक्रमांंमधील गैरहजेरीबद्दल मोठी माहिती दिली आहे.अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून दिली आहे.
अजित पावारांची काल आरोग्य तपासणी करण्यात आली. यातून अजित पवारांना डेंग्यू झाल्याचं निदान झालं आहे. पुढील काही दिवस अजित पवारांवर वैद्यकीय उपचार केले जातील. तसेच त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणार नाहीत.
प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नसल्याबद्दल प्रसारमाध्यमांवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या पाहता मी स्पष्ट करू इच्छितो की, अजित पवारांना कालच डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. पुढचे काही दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. त्यांना वैद्यकीय उपचार आणि विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पटेल यांनी म्हटले आहे की, अजित पवार हे जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहेत. ते पूर्णपणे बरे झाल्यावर त्यांचं काम सुरू करतील. बरे झाल्यानंतर ते त्यांची लोकांप्रती असलेली सार्वजनिक कर्तव्ये पूर्ण शक्तीने पार पाडतील.