या सगळ्यामागे दिल्लीचा अदृश्य हात : सुप्रिया सुळेंचा आरोप

0
13

पुणे : प्रतिनिधी
गेल्या वर्षभराहून अधिक काळ महाराष्ट्रात शिवसेनेतील पक्षफुटीची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. कायदेशीर लढा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकालही राज्याने पाहिला. आता तशाच काहीशा घडामोडी राष्ट्रवादी कांँग्रेसमधील फुटीबाबतही घडू लागल्या आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांना लक्ष्य केले जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या सगळ्या घडामोडींच्या मागे दिल्लीचा अदृष्य हात असल्याचा दावा केला आहे.
आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते मात्र चार महिन्यांनंतरही त्यावर निर्णय न झाल्यामुळे ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले. त्यानंतर दोनच दिवसांत विधानसभा अध्यक्ष दिल्लीत दाखल झाले.कायदेतज्ज्ञांशी आपण चर्चा केल्याचे राहुल नार्वेकर माध्यमांना म्हणाले. तसेच, सोमवारपासून या प्रकरणाची सुनावणी लावल्याचेही समोर आले आहे.
राहुल नार्वेकर दिल्लीहून परत आल्यानंतर अजित पवार गटानंही शरद पवार गटाविरोधात अपात्रतेच पत्र अध्यक्षांना सोपवले आहे. शरद पवारांसोबत राहिलेल्या आमदारांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे.या संदर्भात आता सुप्रिया सुळेंनी भाजपा व अजित पवार गटाला लक्ष्य केले आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळेंनी यावेळी अजित पवार गटावर टीकास्र सोडले. “निवडणूक आयोगाला आमच्यातल्या काही घटकांनी पत्र लिहिले आहे, आम्ही नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख ही फक्त शरद पवार आहेत. 83 वर्षांच्या माणसाने स्वत:च्या हिंमतीवर शून्यातून राजकारण सुरू केले.त्यांनी स्वत:च्या हिंमतवर काढलेल्या पक्षातून त्यांनाच काढण्याचे पाप केले जात आहे. ज्यांना आपण वडिलांच्या जागेवर ठेवतो, ज्यांना विठ्ठलाच्या जागेवर ठेवल्याची भाषणं हे करतात, त्यांनाच त्यांच्याच घरातून बाहेर काढण्याच्या गोष्टी कानावर येत आहेत. ही कोणती संस्कृती यांनी काढली आहे?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.
“आजपर्यंत मराठी व भारतीय संस्कृतीत मुलगा आई-वडिलांसाठी घर बांधतो, आई-वडिलांची सेवा करतो. मोठा भाऊ घरात राहिला तर धाकटा भाऊ सोयीसाठी म्हणून दुसरं घर करतो. समोर येणारी ही नवी संस्कृती दुर्दैवी आहे. पण ही संस्कृती राष्ट्रवादी काँग्रेसची नाही. दिल्लीवरून एक अदृश्य हात आहे.तो सातत्याने हे कट-कारस्थान महाराष्ट्राच्या विरोधात करत आहे. हे राष्ट्रवादी कांँग्रेसचे संस्कार नाहीत”, असे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here