हांगझाऊ : वृत्तसंस्था
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेेत भारताने आणखी एक सुवर्णपदक पटकावले आहे.स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. दीपिक पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग या जोडीने भारतासाठी हे पदक जिंकले आहे.या जोडीने अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.भारताने हा सामना २-० ने जिंकला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे २० वे सुवर्णपदक आहे. भारताने यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत इतकी सुवर्णपदके जिंकली नव्हती.या खेळांमधील भारताचे हे ८३ वे पदक आहे. भारताची आशियाई स्पर्धेतील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
कठीण स्पर्धेत शानदार विजय
भारताची स्कोअर लाइन २-० अशी असेल पण हा सामना भारतीय संघासाठी सोपा नव्हता. भारताने मलेशियाच्या आयफा बिंती अजमान आणि मोहम्मद स्याफिक बिन मोहम्मद कमाल यांचा ११-१०, ११-१० असा पराभव केला. ३५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात दीपिका आणि हरिंदर यांनी कधीही हार मानली नाही आणि सर्व प्रयत्न करूनही प्रतिस्पर्धी संघाला सामना जिंकू दिला नाही.मलेशियन संघाने सलग सात गुण घेत गुणसंख्या ३-९ वरून १०-९ अशी कमी केली. भारत हा सामना हरणार असे वाटत होते पण दीपिका आणि हरिंदरने स्वतःवर नियंत्रण ठेवत सामना जिंकला.
दीपिकाचे दुसरे पदक
दीपिकाचे या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. याआधी तिने महिला संघासह कांस्यपदक जिंकले होते. आता तिच्या खात्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांची सहा आशियाई क्रीडा पदके जमा आहेत.