नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने चाहत्यांना मोठा धक्का दिला. डेव्हिड वॉर्नरने आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानसोबत खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील संघाचा भाग आहे. ही कसोटी मालिका देखील वॉर्नरच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील शेवटची मालिका आहे. यानंतर डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबाबत वॉर्नरने यापूर्वीच सांगितले आहे.
वॉर्नरने या टूर्नामेंटमध्ये खेळणार
एकदिवसीय आंंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यासोबतच डेव्हिड वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पुनरागमन करण्याचे संकेतही दिले आहेत.निवृत्तीची घोषणा करताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, जर तो चांगले क्रिकेट खेळत राहिला आणि ऑस्ट्रेलियन संघाला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची गरज भासली तर तो संघासाठी नक्कीच उपस्थित असेल.
डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी सलामीचा फलंदाज आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजारांहून अधिक धावा आहेत.याशिवाय एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा वॉर्नर हा रिकी पाँटिंगनंतरचा दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे.
डेव्हिड वॉर्नरला आयपीएलचा खूपच अनुभव आहे. डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये १७६ सामने खेळले आहेत. या कालावधीत वॉर्नरने ६३९७ धावा केल्या आहेत. वॉर्नरने आयपीएलमध्ये ४ शतके आणि ६१ अर्धशतके केली आहेत. सध्या वॉर्नर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो.



