अंबाबाई देवीचे दर्शन गाभाऱ्यातून सुरू

0
21

कोल्हापूर : वृत्तसंस्था

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आजपासून गाभाऱ्यात जाऊन पुन्हा एकदा घेता येऊ लागले आहे. राखी पौर्णिमेच्या या भेटीमुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन गर्दीचे दिवस वगळता पुन्हा पितळी उंबऱ्याच्या आतून घेता येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. आज बुधवारपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. कोरोनाच्या काळात भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन बंद करून पितळी उंबऱ्यापासून दर्शन दिले जाऊ लागले होते. त्यानंतरही हा निर्णय कायम ठेवण्यात आला होता. अशा दर्शनामुळे भाविकांना समाधान मिळत नव्हते, त्यामुळे त्यांनी पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाची मागणी चालवली होती. दरम्यान, आज सकाळपासून भाविकांना गाभाऱ्यातून दर्शनाला प्रारंभ झाला आहे.
संभ्रमावस्था कायम
पालकमंत्री केसरकर यांनी गर्दीचे दिवस वगळता पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शन मिळणार असल्याचे विधान केले आहे. गर्दीचे दिवस म्हणजे नेमके कोणते, याबाबत स्पष्टता द्यावी लागणार आहे. त्यामुळे संभ्रमावस्था कायम राहिली आहे. अचानक भाविकांची गर्दी वाढल्याने पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शन सुविधा मिळाली नाही तर वादाचे प्रकार घडण्याची चिन्हे आहेत.
सकाळी पावणेपाच वाजता देवीचा दरवाजा उघडल्यापासून भाविकांना पितळी दरवाजातून दर्शन सुरू केले आहे. भाविक शिस्तबद्धपणे दर्शन घेत आहेत, असे देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here