नाशिक, जळगावात दुष्काळाचे ढग गडद

0
26

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी

भारतासह राज्यावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. तीन महिन्यात पावसाची मोठी तूट दिसून आली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये पावसाने पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात भारतात शतकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात फक्त १६० मिमीच्या जवळपास पाऊस झाला आहे. ऑगस्ट २०२३ हे मान्सून वर्ष १९०१ नंतरचा सर्वात कोरडा महिना म्हणून नोंदवला गेला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाची स्थिती ओढावली आहे. १ जूनपासून संपूर्ण देशात मान्सूनमध्ये पावसाची तूट वाढत गेली. ऑगस्टअखेरपर्यंत देशातील पावसाची तूट ९ टक्कयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यातच पुन्हा एकदा मान्सून ब्रेकची स्थिती असल्याने ही तूट आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे ५८ टक्के तूट निर्माण झाली आहे.

जळगावात १३ गावांना टँकरने पाणी पुरवठा
जळगाव : जिल्ह्यात पावसाअभावी जलसंकट उभे राहण्याची शक्यता असून, आतापर्यंत सरासरीच्या अवघा ५३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांत सरासरीपेक्षा कमी म्हणजे ४२.५३ टक्के जलसाठा असून, अग्नावती आणि हिवरा हे मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. गतवर्षी २८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये ७३.६७ टक्के जलसाठा होता. सप्टेंबरमधील परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात सद्यःस्थितीत १३ गावांत १५ टँकर सुरू आहेत. जून कोरडा गेला. जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण तुरळकच राहिले. पिके करपू लागली आहेत. सद्यःस्थितीत पिकांना पाणी देण्याची गरज आहे. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा, जळगाव, चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव परिसरात यंदा दुबार-तिबार पेरणी करावी लागली आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर प्रकल्प मिळून सुमारे ४२.११ टक्के जलसाठा असून, अग्नावती व हिवरा प्रकल्प कोरडेठाक आहेत.

नाशिकच्या ५४ मंडळात २१ दिवसांपासून पाऊस नाही.
नाशिक ः जिल्ह्यातील अनेक भागात तीन ते चार आठवड्यांपासून उन्हाळ्यासारखी स्थिती आहे. पावसाचे कुठेही चिन्हं नाहीत. जिल्ह्यातील ९२ पैकी सुमारे ५४ मंडलात २१ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. गतवर्षी पूर्णपणे व्ोगळे चित्र होते. ऑगस्ट २०२२ अखेरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक ८८३ मिलीमीटर म्हणजे ११९ टक्के पाऊस झाला होता. धरणे तुडूंब झाल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. सर्वच नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. यंदा मात्र विपरित स्थिती आहे. पावसाअभावी गोदावरी दुथडी भरून वाहू शकली नाही. ग्रामीण भागातील अनेक नद्या, नाले कोरडे दिसतात. धरणांची स्थिती िंचताजनक आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणांची ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट इतकी क्षमता आहे. त्यामध्ये सध्या ४३ हजार ८७५ दशलक्ष घनफूट म्हणजे ६७ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी हेच प्रमाण ९५ टक्के होते. म्हणजे सर्वच धरणे तुडुंब भरलेली होती. याव्ोळी पिण्यापुरतीच पाण्याची उपलब्धता होईल अशी स्थिती आहे. दुष्काळाचे संकट गडद झाले असताना हंगामाचा अखेरचा टप्पा सुरू होत आहे. परतीच्या पावसाने अनेकदा जोरदार हजेरी लावलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here