नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’तील घटक पक्षांशी जागावाटपासाठी काँग्रेसच्या वाटाघाटी होत असल्या तरी, स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची वेळ आली तर त्यासाठी देखील तयारी केली जात आहे. लोकसभेच्या ५४१ जागांचा आढावा घेतला जात असून प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या निरीक्षकांकडून अहवाल सादर झाल्यानंतर काँग्रेस महत्त्वाच्या राज्यांतील जागावाटपावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागांसाठीही निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. कोल्हापूरसाठी पृथ्वीराज चव्हाण, सांगलीसाठी सतेज पाटील, साताऱ्यासाठी रवींद्र धंगेकर, जळगावसाठी यशोमती ठाकूर, रावेरसाठी प्रणिती शिंदे, वर्ध्यासाठी नितीन राऊत, अमरावतीसाठी चंद्रकांत हंडोरे, हिंगोलीसाठी अशोक चव्हाण, नांदेडसाठी विजय वडेट्टीवार, परभणीसाठी रजनी पाटील, भिवंडीसाठी अनिस अहमद, नाशिकसाठी अमित देशमुख, मावळसाठी हुसैन दलवाई, पुण्यासाठी विश्वजीत कदम, अहमदनगरसाठी मनोज जोशी, शिर्डीसाठी बाळासाहेब थोरात, सोलापूरसाठी बसवराज पाटील या वरिष्ठ नेत्यांकडे एकेका मतदारसंघाची जबाबदारी आहे.
राज्यातील अपेक्षित जागांचा अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वासनिक समितीला दिलेला आहे. शिवाय, निरीक्षकांकडूनही स्वतंत्र आढावा घेतला जाणार आहे. निरीक्षकांचे मतदारसंघनिहाय मूल्यमापनाचा अहवाल येण्याआधी महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी जागावाटपांची प्राथमिक चर्चा केली जाऊ शकते मात्र, लोकसभेच्या सर्व मतदारसंघांचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांच्याशी अंतिम बोलणी केली जातील. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत, पुढील १०-१२ दिवसांमध्ये काँग्रेस घटक पक्षांशी जागावाटपासंदर्भात निर्णय घेईल असे स्पष्ट केले होते.
गटनिहाय छाननी समिती
काँग्रेसने राज्यनिहाय पाच गट केले असून प्रत्येकासाठी छाननी समिती नियुक्त केली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, ओदिशा, अंदमान-निकोबार या गटासाठी नियुक्त केलेल्या छाननी समितीचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री असतील. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, दिल्ली, दमण-दिव, दादरा-नगर-हवेली या गटासाठी छाननी समितीचे अध्यक्षपद रजनी पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.