धुळे, नंदुरबार लोकसभेच्या जागा काँग्रेसच लढेल

0
61

मुंबई : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणूक येत्या एप्रिल, मे महिन्यात होणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोघांची जोरदार तयारी सुरू आहे. दिल्लीत मविआचा अंतिम फॉर्म्युला ठरला,आता उत्सुकता शिक्कामोर्तबाची आहे. गेल्या निवडणुकीत ज्यांनी ज्या जागा लढवल्या आणि उमेदवार निवडून आणले आहेत, ज्या ठिकाणी पराभव झाला पण कमी मतांनी, अशा जागा त्या- त्या पक्षाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत नुकतीच महत्त्वाची बैठक झाली होती. विशेष म्हणजे या बैठकीत वंचित आघाडी, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष,आमदार हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी यांना देखील महाविकास आघाडीत घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जागा वाटपात एकमत करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत ठरलेल्या फार्म्युल्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला १८-१९ जागा, काँग्रेस १३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १० जागा, वंचित आघाडी २ जागा, स्वाभिमानी शेतकरी पक्ष २ जागा, बहुजन विकास आघाडी १ जागा यावर एकमत झाले आहे. मात्र अजून चार जागांवर असलेल्या चर्चा अंतिम टप्यात असून लवकरच मविआचे अंतिम जागावाटप जाहीर करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतून सहा लोकसभा जागांपैकी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या तीन जागा शिवसेना उबाठा लढणार असून उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागा काँग्रेस लढणार असून उत्तर पूर्व मुंबईची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडण्यात आली आहे. तर रायगड, संभाजी नगर या दोन जागा उबाठाला सोडण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना उबाठा १८-१९ जागा लढणार आहे.
दरम्यान, काँगसच्या १२ जागांपैकी उत्तर मुंबई, भिवंडी, पुणे,सोलापूर, लातूर,नांदेड, धुळे,नंदुरबार,नागपूर,रामटेक,चंद्रपूर,गडचिरोली, तर वंचितसाठी अकोला, शिर्डी आणि राजू शेट्टी यांना कोल्हापूर,हातकडंगले, तर बहुजन विकास आघाडी सामील झाल्यास त्यांना पालघरची जागा सोडण्यात येईल, यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here