साईमत जळगाव प्रतीनिधी
अभिवाचनाचे कौशल्य शिक्षकांसाठी प्रभावी अस्त्र असून त्याचा सुयोग्य वापर केल्यास शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. शमा सुबोध सराफ यांनी केले. रोटरी क्लब जळगावतर्फे शालेय शिक्षकांसाठी आयोजित अभिवाचन कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
याप्रसंगी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष मनोज जोशी, मानद सचिव ऍड. हेमंत भंगाळे, लिटरसी कमिटी चेअरमन डॉ. शुभदा कुलकर्णी व प्रकल्प प्रमुख सुबोध सराफ मंचावर उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, एखादी कथा, लेख किंवा कोणत्याही प्रकारचे लिखाण वाचून दाखवताना त्याला वाचिक अभिनयाची जोड दिली की ते अभिवाचन होते. आपल्या आवाजातील अभिनयातून वाचन प्रभावी आणि उठावदार करणे हे ह्यातून अभिप्रेत आहे. तुम्हाला हातात स्क्रिप्ट घेऊन आणि एका जागी बसून किंवा उभं राहून अभिवाचन करायचे असते. विद्यार्थ्यांना वाचनाची-अभ्यासाची गोडी लावण्यासाठी अभिवाचन कौशल्य उपयुक्त ठरते. शिक्षकाचे अभिवाचन कौशल्य त्याला विद्यार्थीप्रिय शिक्षक बनण्यासाठी लाभदायक ठरते असेही त्या म्हणाल्या.
दुसऱ्या सत्रात रो. सुबोध सराफ यांनी अभिवाचक आपल्या समोरच्या कागदावर लिहिलेले वाचतो. हे करीत असताना या कागदावरील त्या हृदयी पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम तो करीत असतो. केवळ वाचन म्हणजे अभिवाचन नसून शब्दाला सजीव करून त्यात प्राण फुंकतो, तो अभिवाचक. विरामचिन्हे ही भाषेचा अलंकार आहेत. याचा अभिवाचकांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. वाचन करतांना जिवंतपणा, जिव्हाळा, जिद्द आणि जिज्ञासा या गोष्टी लक्षात ठेवाव्यात असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात सहभागी प्रशिक्षणार्थींचा अभिवाचनाचा सराव करुन घेण्यात आला.
कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ शुभदा कुलकर्णी यांनी केले. अभिवाचन ही वाचनाची पुढची पायरी असून ते कसे करावे, त्याची परिणामकारकता कशी वाढवावी यासाठी शालेय शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी पूनम मानुधने, राघवेंद्र काबरा, कॅप्टन मोहन कुळकर्णी, पराग अग्रवाल, शशिकांत कुळकर्णी, सागर चित्रे, स्वाती ढाके, श्रीकांत भुसारी, रितेश जैन, गिरीश कुळकर्णी आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या उपयुक्ततेबाबत भैय्यासाहेब देवरे, साहेबराव बागुल, दिपाली सहजे यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी रो. पंकज व्यवहारे, योगेश गांधी, हेमिन काळे आदींनी सहकार्य केले तर डॉ. शुभदा कुळकर्णी यांनी आभार मानले. कार्यशाळेचा १५ शाळांच्या शिक्षकांसह ३० प्रशिक्षणार्थींना लाभ घेतला.