हांगझाऊ : वृत्तसंस्था
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची विजयी मालिका कायम आहे. ग्रुप स्टेजमध्ये अपराजित राहून भारताने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. महिला संघाने त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात हाँगकाँगचा १३-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाकडून सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा आहे.
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात, भारतीय स्ट्रायकर वंदना कटारिया, उपकर्णधार दीप ग्रेस एक्का आणि दीपिकाने हॅट्ट्रिक साधली, ज्यामुळे भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकी स्पर्धेत हाँगकाँगवर १३-० असा विजय मिळवला. शेवटच्या गट सामन्यातील विजयाने भारतीय संघाचे मनोबल अधिक उंचावले आहे.
वंदना कटारिया मैदानावर आज जबरदस्त फॉर्ममध्ये होती, तिने दुसऱ्या, १६व्या आणि ४८व्या मिनिटाला गोल केले. त्याचप्रमाणे दीप ग्रेसने ११व्या, ३४व्या आणि ४२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले. त्यानंतर दीपिकानेही चौथ्या, ५४व्या आणि ५८व्या मिनिटाला गोल केले. संगीता कुमारी, मोनिका आणि नवनीत कौर यांनीही गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.