मुंबई : प्रतिनिधी
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली असून लवकरच एकदिवसीय आणि कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या दोन्ही मालिकांआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहरचा समावेश एकदिवसीय संघात करण्यात आलेला नाही तर मोहम्मद शमीला कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही.
बीसीसीआयने ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे. कुटुंबातील वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे आपण आगामी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे चहरने कळवल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. दीपकच्या जागी नवख्या आकाशदीपला संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या मोहम्मद शमीचा कसोटी मालिकेतील समावेश त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून होता. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला खेळण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत शमी संघात नसेल.
१७ डिसेंबरला जोहान्सबर्गमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळल्यानंतर श्रेयस अय्यर थेट कसोटी मालिकेत खेळताना दिसेल.तो दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसणार नाही. टीम इंडियासोबत कसोटी मालिकेवेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप
असतील.
