‘बीआरएस’ राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार

0
15

मुंबई : प्रतिनिधी

तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व २८८ जागा लढवणार आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समन्वयक नेमण्यात आले असून राज्यात २० लाख ८५ हजार पदसिद्ध पदाधिकारी यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
राज्याच्या आग्नेय सीमेलगतच्या तेलंगणा राज्यात ‘बीआरएस’ सत्ताधारी पक्ष आहे. या पक्षाने महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रित केले आहे. आज या पक्षाचे राज्यातील १७ हजार गावांत पदाधिकारी आहेत. ‘पुढच्या दोन महिन्यात आमची पक्ष सदस्य नोंदणी २ कोटीच्या पुढे जाईल’, असे भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी सांगितले.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक समन्वयक नेमण्यात आला आहे. त्याच्याकडे टॅब देण्यात आला असून प्रचाराचे सर्व साहित्य पोच करण्यात आलेले आहे. राज्यात विभागनिहाय कार्यालये स्थापन करण्यात येत असून जागांचा शोध चालु आहे. आश्चर्य म्हणजे पक्ष पदाधिकारी यांच्या बँक खात्यात पक्षाने प्रत्येकी २ ते ५ लाख रुपये निधी वर्ग केला आहे. महाराष्ट्रात बूळ रोवण्यासाठी या पक्षाने प्रवेश करण्यासाठी हजारो कोटी खर्च केले आहेत.
पक्षात सध्या ३ माजी खासदार आणि १५ माजी आमदारांनी प्रवेश केला आहे. त्यामध्ये हरिभाऊ राठोड, धर्माण्णा सादूल, शंकर धोंडगे, भानुदास मुरकुटे, चरण वाघमारे अशा नामवंत नेत्यांचा समावेश आहे. या पक्षाच्या दलित, ओबीसी, युवा, महिला असे विविध ९ समित्या आहेत. पक्ष पोचलेल्या प्रत्येक गावात या समित्या स्थापन झाल्या आहेत.
‘बीआरएस’ पक्षावर भाजपची ‘बी- टीम’ असल्याचा राज्यातील विरोधक आरोप करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची ‘वंचित बहुजन आघाडी’ जशी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पराभवाचे कारण ठरली, त्या इतिहासाची पुनरावृत्ती के. चंद्रशेखर राव यांची ‘बीआरएस’ करते का, याची उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here