विम्याची रक्कम हडपण्यासाठी मेहुण्याकडून शालकाचा खून
जळगाव (प्रतिनिधी)
विम्याची रक्कम हडपण्यासाठी धुळे जिल्हयातील फागणे येथील शालकाची शेवगे (ता. पारोळा ) येथील मेहुण्याने एकाच्या मदतीने शालकाचा अपघाताचा बनाव करून खून केल्याची घटना उघडकीस आली. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली त्यांना न्यायालयाने ३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
फागणे येथील समाधान पाटील याचा अपघाती मृत्यू झाल्याने १९ एप्रिलरोजी पारोळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग विसावे, पोहेकॉ सुनील हटकर, संजय पाटील, अनिल राठोड, अभिजीत पाटील यांनी तपास केला. यात काहीतरी वेगळे असल्याचं जाणवले.
मयताचा मेहुणा संदीप पाटील (वय ४०) तसेच चंद्रदीप आधार पाटील (वय ४५, रा.खवशी ता. अमळनेर) यांनी कट रचून शालक समाधान पाटील याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. संदीप पाटील याने शालक समाधान पाटील याच्या नावावर विमा पॉलिसी काढून ठेवल्याचे उघडकीस आले. अपघातात वापरलेली स्कुटी (एम एच ५४ ए ९५१३) देखील पूर्णपणे इन्शुरन्स काढलेली होती. समाधानचा खून करून त्याची विमा पॉलिसी रक्कम व दुचाकीची विमा रक्कम आपल्याला मिळावी या हव्यासापोटी समाधानचा खून केल्याचे उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दोघा आरोपीना अमळनेर तालुक्यातून अटक केली आहे. पोलिसांनी चौकशी केली असता समाधान याला संदीप व चंद्रदीप यांनी धुळे ते जळगाव जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याच्या कडेला घेऊन जाऊन अंधारात लोखंडी रॉडने मारहाण करून शालक समाधान यास जीवे ठार केल्याची कबुली दोघी आरोपींनी दिली आहे. तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.