जळगाव (प्रतिनिधी)-
धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुकचा ग्राम विकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणेला (वय ३७) २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. आरोपीने तक्रारदाराकडून गटारी आणि गावहाळ बांधकामाच्या बिलाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने खर्दे बुद्रुक गावात २ लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते, त्यांना २ लाख ६४ हजार रुपयांचे चेक मिळाले. मात्र, ग्राम विकास अधिकाऱ्याने या बिलांच्या प्रक्रियेसाठी १० टक्के लाचेची मागणी (२७ हजार रुपये) केली. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मार्चरोजी दुपारी सापळा रचण्यात आला. आरोपी ब्राम्हणेने २५ हजार रुपये स्वीकारताच रंगेहात पकडण्यात आले.
धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात पोउनि सुरेश पाटील, पो ना किशोर महाजन आणि पो कॉ अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.