लाचखोर भूकरमापक एसीबीच्या ‘मोजणीत’ अडकला
जळगाव (प्रतिनिधी)-
रावेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक राजेंद्र कुलकर्णीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. कुलकर्णी यांनी शेतजमिनीच्या मोजणीसाठी एका शेतकऱ्याकडून ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार (वय ३०) आणि त्यांचे काका यांची मस्कावद येथे सामाईक शेती आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी ७ जानेवारी रोजी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून शासकीय शुल्क भरले होते. १८ फेब्रुवारी रोजी भूकरमापक राजेंद्र कुलकर्णी यांनी शेतात जमिनीची मोजणी केली. मोजणीच्या खुणा दाखवण्यासाठी कुलकर्णी यांनी तक्रारदाराकडे ५ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्यावर कुलकर्णी यांनी पैशांऐवजी शेतातील हरभरा देण्याची मागणी केली.
तक्रारदाराने ४ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पथकाने तक्रारीची पडताळणी केली कुलकर्णी यांनी तक्रारदाराकडे ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. २६ मार्च रोजी निंभोरा येथे सापळा रचून कुलकर्णी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शेतीच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांना शासकीय शुल्क भरूनही लाच द्यावी लागते असे चित्र आहे. रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.