रेल्वे आरक्षण ई-तिकिटांचा काळाबाजार ; तरुणाला अटक
जळगाव (प्रतिनिधी)-
पुणे सायबर सेलने रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश केला आहे. संशयास्पद युजर आयडीच्या मदतीने तिकिटे बनविणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. भुसावळचे वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
संशयित आरोपीचे नाव ज्ञानेश्वर गुलाब पाटील (वय ३८,वर्षे, रा. मुकटी, ता. धुळे) आहे. २६ रोजी पुणे सायबर सेलकडून रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या काळाबाजारामध्ये संलग्न संशयिताबाबत माहिती मिळाली. त्यानुसार रेल्वे संरक्षण दल चौकी चाळीसगाव येथे गुन्हा नोंदवण्यात आला. पथकाने आरोपीकडून २४३ ई-तिकिटे जप्त केली आहेत. या तिकीटांची किंमत ४ लाख २० हजार ९६२ रुपये आहे. यात ८८ आगाऊ प्रवासाची तिकिटे, ज्याची किंमत १ लाख ७८ हजार २१३ आणि १५५ प्रवास पूर्ण झालेली तिकिटे ज्याची किंमत २ लाख ४२ हजार ७४८ रुपये आहे.
अवैध तिकिट बुकिंगसाठी वापरलेला रेडमी कंपनीचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला नोटीस देऊन त्याला सोडण्यात आले आहे. एसआयपीएफ आर. के. सिंग, राजेंद्र भामरे व आरक्षक राकेश खलाणे यांच्या पथकाने केली. सहायक उपनिरीक्षक राजेंद्र भामरे पुढील तपास करीत आहेत.
