अमळनेरात पुरोगामी पुस्तकांच्या पताका लावलेल्या नांगराने भूमिपूजन

0
22

अमळनेर: प्रतिनिधी

येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरीच्या जागेत विविध पुरोगामी पुस्तकांच्या पताका लावलेला नांगर फिरवून प्रसिद्ध विचारवंत डॉ. संग्राम पाटील यांनी वैचारिक पेरणी करीत भूमिपूजन केले.
आर. के. पटेल उद्योगसमूहाचे उद्योगपती प्रवीण पाटील अध्यक्षस्थानी होते. मंचावर ग. स. बँकेचे संचालक राम पवार, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल, प्रा. शिवाजीराव पाटील, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील आदी उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी, विचार करून प्रश्न विचारणे आणि सत्य सांगण्याची संत तुकारामांची विद्रोही परंपरा १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत अर्थात अमळनेरमध्ये सुरू असल्याने इंग्लंडहून अमळनेरला आल्याचे सांगितले.
विद्रोही साहित्य संमेलनासाठी उत्स्फूर्तपणे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. संग्राम पाटील यांनी उद्योगपती प्रवीण पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी प्रास्ताविक केले. निमंत्रक रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. स्वागताध्यक्ष श्याम पाटील यांनी आभार मानले. यावेळी साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, प्रा. गौतम निकम, प्रा. सुभाष पाटील, बापूराव ठाकरे, कैलास पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here