जळगाव : प्रतिनिधी
रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींमधील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर हा उत्सव सर्वदूर उत्साहात साजरा झाला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण लाडक्या भाऊरायाला राखी बांधते आणि भाऊदेखील बहिणीसाठी वेळप्रसंगी कोणताही त्याग करण्यासाठी तयार असल्याचे वचन बहिणीला देतो.पण जळगावमधील एका भावाने आपल्या लाडक्या दोन्ही बहिणींना हेल्मेटची भेट देत त्यांची काळजी असल्याचा जिव्हाळा घट्ट तर केलाच पण नवीन पायंडा समाजासमोर ठेवला आहे
येथील ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे यांच्या दोन मुली आणि मुलगा पुण्यात कोथरूड भागात शिक्षणानिमित्त राहतात. मोठी मुलगी धनश्री ही पुणे विद्यापीठात एमएसस्सी बॉटनीच्या फायनल वर्षाला तर दुसरी मुलगी भाग्यश्री अग्रीकल्चर बिजनेस मॅनेजमेंटच्या तिसऱ्या वर्षाला आकुर्डीत आहे. या दोन्हीचा भाऊ गौरव हा सुद्धा लोहगाव येथे पॉलिटेक्निक करतोय. धनश्री व भाग्यश्री रोज कोथरूडमधुन शिक्षणासाठी दुचाकीने जातात. गौरव हा वयाने सज्ञान नसल्याने वाहन परवान्याअभावी मात्र पीएमटी बसने प्रवास करतो. पुण्यातील वाहतुकीची वाढती समस्या आणि अपघाताचे चित्र पाहता काळजीतून आपल्या दोन्ही बहिणी लांबवर प्रवास करताना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गौरवने वेगळा निर्णय घेत आपल्या दररोज घरून मिळणाऱ्या खर्चात बचत करत दोन्ही बहिणींनी राखी बांधल्यावर रक्षाबंधनाची भेट म्हणून हेल्मेट ताटात दिले. आजच्या पाश्चात संस्कृतीत चॉकलेट आणि मोमोजची अपेक्षा करणाऱ्या या बहिणींनी जेव्हा गिफ्ट बॉक्समध्ये ही भेट पाहिली तर त्यांच्या दोघांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू दाटून आले. समाजाला अपघाताच्या मालिकेतून वाचवण्यासाठी पोलीस व परिवहन विभाग हेल्मेटची सक्ती मोहीम रावत असताना आज गौरव ठाकरे याने रक्षाबंधनानिमित्त अनोख्या पद्धतीने आपल्या बहिणींना सुरक्षेच्या दृष्टीने आगळी वेगळी भेट म्हणून हेल्मेट दिल्याने समाजासमोर एक आदर्श ठेवत बहीण-भावातील जिव्हाळा दाखवून दिला आहे.