नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचा सामना करण्यासाठी एकत्रित आलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या जागा वाटपावर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा सुरु होण्यापुर्वी शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.त्यासाठी इंडिया आघाडीतील सपा नेते अखिलेश यादव,तृणमूलच्या ममता बॅनर्जी,जदयूचे नितीशकुमार व राजदचे लालूप्रसाद यादव हे आग्रही भूमिका घेत असल्याचे वृत्त आहे.
यात्रा १४ जानेवारीपासून
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’नंतर आता मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढणार आहेत. या यात्रेला ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. ही यात्रा १४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मणिपूरची राजधानी इम्फाळमधून सुरू होईल आणि मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबईत थांबेल. तब्बल ६,७०० किमी लांब अशी ही पदयात्रा देशातल्या १५ राज्यांमधून जाईल. काँग्रेसने त्यांच्या सर्व मित्रपक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
यात्रेआधी जागावाटप व्हावे
राहुल गांधी या यात्रेदरम्यान देशातील १५ राज्यांच्या ११० जिल्ह्यांमधून प्रवास करतील. या यात्रेतला सर्वाधिक काळ राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये असतील. ते ११ दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये १०७४ किमी प्रवास करतील आणि या काळात २० जिल्ह्यांना भेट देतील. या यात्रेत उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचा मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीमधील सदस्य समाजवादी पार्टी सहभागी होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर सपा प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर दिले आहे. अखिलेश यादव म्हणाले की, या यात्रेआधी लोकसभेसाठी जागावाटप व्हायला हवे.
उमेदवार यात्रेत सहभागी होतील
तुम्ही या यात्रेत सहभागी होणार का? असा प्रश्न विचारल्यावर अखिलेश यादव म्हणाले, राहुल गांधींची ही यात्रा होतेय ही चांगली गोष्ट आहे परंतु, सगळ्या पक्षांना असं वाटतं की, या यात्रेआधी जागावाटप झाले पाहिजे. जागावाटप झाले तर यात्रेत अनेक लोक स्वतःहून मदतीसाठी येतील. निवडणूक लढणार आहे तो प्रत्येक उमेदवार जबाबदारीने तिथे उभा असेल, यात्रेत सहभागी
होईल.
सगळेच भक्कमपणे लढू शकतात
अखिलेश यादव पुढे म्हणाले की, सध्या तरी ही यात्रा केवळ कांँग्रेसची आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, इंडिया आघाडीत जितके विरोधी पक्ष आहेत, जसे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि इतर सगळेच पक्ष जे काँग्रेसशी युती करून भाजपाविरोधात लढणार आहेत, त्यांची अशी इच्छा आहे की, या यात्रेआधी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप पूर्ण व्हावे. आधी जागावाटप, त्यानंतर यात्रा आणि मग निवडणूक असा क्रम असेल तर खूप भक्कमपणे सगळेच जण लढू शकतील.
