तहसीलदारांच्या बनावट सह्यांसह जन्म-मृत्यूचे
४३ बोगस दाखले मिळवण्याचा प्रयत्न ; चौकशीनंतर गुन्हे नोंदवणार
जळगाव (प्रतिनिधी)-
महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात ४३दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. बनावट जन्मदाखले तयार करून नागरिकत्व मिळवण्याच्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे. या गैरव्यवहाराच्या चौकशीनंतर महापालिका आणि तहसीलदार कार्यालय स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
फेब्रुवारी महिन्यात अवघ्या बारा दिवसांत ५० अर्ज दाखल झाले होते त्यातील ४९ जन्मदाखले आणि १ मृत्यू दाखला होता. कर्मचारी तपासणी करत असताना तहसीलदारांच्या सहीबाबत शंका निर्माण झाली. चौकशीदरम्यान, फक्त 7 दाखल्यांवर खऱ्या सह्या असल्याचे स्पष्ट झाले, उर्वरित 43 दाखल्यांवर बनावट सह्या आढळल्या. त्यामुळे हा गैरव्यवहार समोर आला आहे.
राज्यात याआधीही रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांनी बनावट जन्मदाखल्यांच्या आधारे नागरिकत्व मिळवल्याचे समोर आले आहे. मालेगावमध्ये अशा बोगस दाखल्यांमुळे पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. जळगावातही बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. महापालिकेने तपास सुरू केला आहे. तहसीलदार कार्यालयाकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.