बनावट कर पावत्या देऊन आरटीओला ठगवण्याचा प्रयत्न फसला ; गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी )
प्रादेशिक परिवहन कार्यालयात बनावट व्यवसाय कर पावत्या सादर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. एजंट आणि वाहन मालकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरटीओ कार्यालयातील कर वसुली अधिकारी चंद्रशेखर शंकरराव इंगळे (वय ५६) यांनी फिर्याद दाखल केली आहे. इंगळे परवाना विभागात कार्यरत असताना २३ एप्रिलरोजी दुपारी सुलतान बेग मिर्झा (रा. उस्मानिया पार्क) हे शाकीब शेख (रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा) यांच्या मालकीचे वाहन क्रमांक (एम एच १८- बी ए ०२२१) चा राष्ट्रीय परवाना रद्द करण्यासाठी अर्ज आणि कागदपत्रे घेऊन आले होते.
या कागदपत्रांमध्ये व्यवसाय कराच्या पावत्या होत्या. तपासणी दरम्यान, इंगळे यांना सन २०२३-२०२४ आणि २०२४-२०२५ या कालावधीतील दोन पावत्या बनावट असल्याचा संशय आला. या संशयावरून त्यांनी व्यवसाय कर अधिकाऱ्यांकडे या पावत्यांची सत्यता पडताळणी करण्यासाठी पत्रव्यवहार केला.
व्यवसाय कर कार्यालयाकडून २४ एप्रिलरोजी प्राप्त झालेल्या लेखी माहितीनुसार, या वाहनाचा सन २०२४-२०२५ या कालावधीचा व्यवसाय कर भरणा झालेला नाही असे स्पष्ट झाले. या बनावटगिरीमुळे शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत कर वसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांनी एजंट सुलतान बेग मिर्झा आणि वाहन मालक शाकीब शेख यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तपास पोलीस निरीक्षक करीत आहेत.