कोलंबो : वृत्तसंस्था
आधी जागेवरून वाद, मग तारखांवरून संभ्रम, संघाच्या निवडीत सुद्धा अडचणी या सगळ्या अडथळ्यांना पार करून आता अखेरीस भारत विरुद्ध पाकिस्तान २०२३ आशिया चषक सामन्याच्या तारीख व ठिकाणावर शिक्कामोर्तब झाले होते. पण आता क्रिकेटप्रेमींसाठी पुन्हा एक वाईट बातमी समोर येत आहे. कँडीपासून ३० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पल्लेकेले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर म्हणजेच जिथे भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप २०२३ चा पहिला सामना रंगणार आहे तिथे सामन्याच्या दिवशी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पावसाची शक्यता किती?
आशिया कप २०२३ मधील अ गटातील एक सामना आस्मानी अडथळ्यामुळे वाया जाणार असल्याची शक्यता तब्बल ९१ टक्के आहे.पल्लेकलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि वेगवेगळ्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या ॲप्सनुसार तर, शनिवारी (२ सप्टेंबर), जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे तेव्हा परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे पाऊस अचानक थांबण्याचा चमत्कार घडल्याशिवाय सामना होणे जवळजवळ अशक्य आहे.
श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियममध्ये आतापर्यंत ३३ एकदिवसीय सामने खेळले गेले आहे आणि त्यापैकी फक्त तीन ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान झाले आहेत.हे स्पष्ट संकेत देते की, श्रीलंका क्रिकेट बोर्ड पावसाळी हंगामामुळे या काळात क्रिकेट सामन्यांचे आयोजन टाळते.
पावसाचे अंदाज असतानाही
आशिया कप श्रीलंकेत का?
पावसाचे अंदाज आणि वातावरण असतानाही आशिया चषकासाठी श्रीलंकेची निवड का करण्यात आली असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना निश्चितच पडू शकतो. याचे उत्तरही बहुधा आपल्यासमोर स्पष्ट असावे. भारताला स्पर्धेचे मूळ एकल यजमान असलेल्या पाकिस्तानला जाण्यासाठी सरकारी मंजुरी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर हायब्रीड मॉडेल निवडण्याखेरीस एशियन काउन्सिलकडे पर्याय नव्हता. परिणामी आशिया चषक २०२३ चे बहुतांश सामने हवामानाचा अंदाज न जुमानता श्रीलंकेत खेळावे लागणार आहेत.
सामना रद्द झाला तर काय होईल?
आशिया चषकाचा सामना हा ५० षटकांचा असल्याने पाऊस झाला तरी निदान २० षटकांची खेळी पूर्ण होण्याचे काहीसे अंदाज आहेत पण ते ही शक्य झाले नाही आणि सामना पूर्णपणे रद्दच झाला तर भारत व पाकिस्तान दोघांनाही सामन्याचे पॉईंट्स वाटून दिले जातील. परिणामी पाकिस्तान आपोआप सुपर ४ टप्प्यासाठी पात्र ठरेल कारण त्यांनी आधीच नेपाळला पराभूत केले आहे पण पुढील फेरीत जाण्यासाठी भारताला त्यांच्या गट सामन्यात नेपाळला पराभूत करावे लागेल.



