कोलंबो : वृत्तसंस्था
आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंंका यांच्यात आज रविवारी (17 ऑक्टोबर ) होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. यानंतर श्रीलंकेने सुपरफोरमध्ये पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपदाच्या सामन्याचे तिकीट मिळवले. आशिया कपमध्ये भारत आणि श्रीलंका संघ अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन्ही संघ अंतिम फेरीत 7 वेळा आमनेसामने आले आहेत.
या दोघांमध्ये 1988 मध्ये पहिला फायनल सामना खेळला गेला होता.ज्यात भारताने बाजी मारली होती. या दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या 7 फायनलमध्ये भारताने 4 विजेतेपदे जिंकून आघाडी कायम ठेवली आहे तसेच श्रीलंकेने भारताविरुद्ध केवळ तीन वेळा विजेतेपदाचा सामना जिंकला आहे. या दोघांमध्ये दुसरा विजेतेपदाचा सामना 1991 मध्ये झाला होता, ज्यामध्ये भारताने पुन्हा एकदा विजय मिळवला होता.त्यानंतर 1995 मध्ये या दोघांमध्ये खेळलेला सामना भारताने पुन्हा जिंकला.
जेतेपदाची हॅट्ट्रिक
भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यांमध्ये भारताने तीन वेळा विजय मिळवत हॅटट्रिक केली. यानंतर 1997, 2004 आणि 2008 मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध सलग तीन फायनल जिंकून हॅट्ट्रिक नोंदवली. मात्र, यानंतर दोघांमध्ये शेवटची विजेतेपदाची लढत 2010 मध्ये झाली, ज्यामध्ये भारताने विजय मिळवून आघाडी घेतली.आता 2023 मध्ये होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
अंतिम फेरीतील विजेते
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीतील विजेता : 1988- भारत,1991- भारत, 1995- भारत, 1997- श्रीलंका, 2004- श्रीलंका, 2008- श्रीलंका, 2010- भारत