इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला रुग्णालय बांधण्यासाठी १०० कोटींचे कंत्राट

0
14

मुंबई ः प्रतिनिधी

कोविड घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरेंच्या काळातील आणखी एक घोटाळा बाहेर काढला आहे. मुलुंड येथे तात्पुरते कोविड सेंटर बांधण्यात आले होते. या कोविड सेंटरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेत्याने १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यानी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली असून याबाबतची तक्रार मुंबई पोलीस, आयकर विभाग, प्रवर्तन निदेशालय (ईडी), कंपनी मंत्रालय यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. याबाबत सोमय्या यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली.

मुलुंड रिचार्डसन क्रुडास मैदानावर तात्पुरते कोविड सेंटर बांधण्यात आले होते. उद्धव ठाकरेंचे निकवटर्तीयाशी संबंधित असलेल्या ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रायवेट लिमिटेड कंपनीला येथे तात्पुरते रुग्णालय बांधण्याचे कंत्राट देण्यात आले असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनी ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. २०१९ पर्यंत काही संगीताचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते. त्या कंपनीला मुलुंड व दहिसर येथील कोविड हॉस्पिटल बांधणे आणि भाड्याने देण्याचा अट्टाहास मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या संगनमताने करण्यात आला, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

“तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकारने रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली. तेथे सिडको यांना तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश देण्यात आले. सिडकोन ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनीला १८५० खाटांचे हॉस्पिटल बांधण्याची ऑर्डर दिली. त्यासाठी १० कोटी ९४ लाख ३० हजार रुपयांचा व्यवहारही करण्यात आला. ७ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२२ पर्यंत म्हणजे २५ महिने हे हॉस्पिटल सुरू होते. त्यासाठी ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनीला दर महिने ३ कोटी ५९ लाख ८७ हजार ३८९ रुपयांचे भाडे देण्यात आले. याचा अर्थ भाड्याच्या निमित्ताने ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनीला सुमारे ९० कोटी रुपये देण्यात आले. तसेच बांधण्यासाठी अधिक रुपये १० कोटी देण्यात आले होते”, असा हिशेबच किरिट सोमय्यांनी मांडला.

“रिचार्डसन क्रूडास कंपनीची जमीन या हॉस्पिटलसाठी वापरण्यात आली, त्यासाठी रिचार्डसन क्रूडासने एकही पैसा घेतलेला नाही, असेही सोमय्या म्हणाले. मुलुंड येथील या तात्पुरते कोविड हॉस्पिटलच्या, ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनीच्या १०० कोटींच्या घोटाळाची चौकशी करण्याची मागणी भाजपा डॉ. किरीट सोमय्या यांनी केली आहे. डॉ. किरीट सोमय्या यांनी या संदर्भात मुंबई पोलीस, आयकर विभाग, प्रवर्तन निदेशालय (ईडी), कंपनी मंत्रालय यांच्याकडे तक्रारही केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here