नवी दिल्ली : वृत्तसंस्था
येत्या ३० ऑगस्टपासून बहुप्रतीक्षित असा आशिया चषक २०२३ खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका अशा दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाचा पाकिस्तान आणि नेपाळसह अ गटात समावेश आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका ब गटात आहेत. या आशिया चषकासाठी बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय संघाची घोषणा केली.
अपेक्षेप्रमाणे जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे, तर संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. या संघात तिलक वर्माची सरप्राईज एन्ट्री झाली आहे. नवी दिल्लीत निवड समितीच्या बैठकीनंतर कर्णधार रोहित आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत १७ सदस्यीय संघाची घोषणा केली.
या खेळाडूंचे संघात पुनरागमन
जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दीर्घ काळानंतर टीम इंडियात परतले आहेत. तिघेही दुखापतीमुळे बराच काळ संघातून बाहेर होते. बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत पुनरागमन केले, तर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर थेट आशिया कपमध्ये खेळताना दिसतील. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या पुनरागमनावर सर्वांचे विशेष लक्ष होते.माजी भारतीय क्रिकेटपटू अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांचा समावेश असलेल्या समितीने संघाची निवड केली आहे. कर्णधार शर्मा आणि प्रशिक्षक द्रविड यांनीही निवड बैठकीला हजेरी लावली.
आशिया चषक २०२३ साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप).