अल्कराझची अपेक्षित घोडदौड; पुरुषांत मेदवेदेव, सिन्नेर, तर महिलांमध्ये पेगुला, जाबेऊरची आगेकूच

0
16

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

गतविजेत्या स्पेनच्या कार्लोस अल्कराझने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील आपली अपेक्षित घोडदौड कायम राखताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. अल्कराझने दुसऱ्या फेरीत लॉईड हॅरिसचे आव्हान 6-3, 6-1, 7-6 (7-4) असे सहज मोडून काढले.
अल्कराझच्या गटातून बहुतेक मानांकित खेळाडू आपले आव्हान राखून आहेत त्याचवेळी दुसऱ्या गटातून नोव्हाक जोकोविचचा मार्ग अधिक सुकर होत आहे.जोकोविचचा समावेश असलेल्या गटातून चौथा मानांकित होल्गर रुन, पाचवा मानांकित कॅस्पर रुड, सातवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. अल्कराझच्या गटातून तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव, सहावा मानांकित यान्निक सिन्नेर, आठवा मानांकित आंद्रे रुब्लेव आणि 12वा मानांकित ॲलेक्झांडर झ्वेरेव हे आघाडीचे खेळाडू स्पर्धेत कायम आहेत.
माजी विजेत्या मेदवेदेवने ख्रिस्तोफर ओकेनेलला 6-2, 6-2, 6-7 (6-8), 6-2 असे, रुब्लेवने गेल मोंफिसला 6-4, 6-3, 3-6, 6-1 असे, तर कॅमरुन नॉरीने यू सु याला 7-5, 6-4, 6-4 असे पराभूत केले.
महिला एकेरीतून तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुला आणि पाचव्या मानांकित ओन्स जाबेऊरने आगेकूच कायम राखली. दुसऱ्या फेरीत पेगुलाने पॅट्रिसिया मारिया टिगचे आव्हान 6-3, 6-1 असे सहज परतवून लावले. त्याचवेळी जाबेऊरला मात्र लिंडा नोस्कोवाचा प्रतिकार सहन करावा लागला. जाबेऊरने 7-6 (9-7), 4-6, 6-3 असा विजय मिळवला.
इस्नेरचा भावपूर्ण निरोप
अमेरिकन टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अमेरिकेच्या जॉन इस्नेरने व्यावसायिक टेनिसमधून चाहत्यांचा भावपूर्ण निरोप घेतला. आठवड्यापूर्वीच इस्नेरने ही आपली अखेरची स्पर्धा असेल असे सांगितले होते.दुसऱ्याच फेरीत अमेरिकेच्याच मायकल ममोहकडून पाच सेटच्या मॅरेथॉन लढतीनंतर इस्नेरला 3-6, 4-6, 7-6 (7-3), 6-4, 7-6 (10-7) असा पराभवाचा सामना करावा लागला. लढतीनंतर कोर्टवरच चाहत्यांशी संवाद साधताना इस्नेर अत्यंत भावूक झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here