अक्षर पटेलने टी-२० मध्ये २०० विकेट्सचा गाठला टप्पा

0
4

इंदोर : वृत्तसंस्था

भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अक्षर पटेलने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या किफायतशीर गोलंदाजीमुळे अफगाणिस्तान संघाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. अक्षरने चार षटकांत १७ धावा देत दोन गडी बाद केले.यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.अक्षरने शेवटच्या टी-२० मध्ये चार षटकात केवळ २३ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या होत्या. यासह त्याच्या टी-२० मध्ये २०० विकेट्सही पूर्ण झाल्या आहेत.

अक्षर पटेल ठरला सामनावीर
अक्षरला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. सामना संपल्यानंतर तो म्हणाला, “छान वाटतंय. मला आत्ताच कळले की, मी टी-२०मध्ये २०० विकेट्स मिळवल्या आहेत. भारतासाठी चांगली कामगिरी करत राहणे हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. खरे सांगायचे झाले तर, मी हा विक्रम काही वर्षांनी विसरून जाईल. काही वर्षानी किती विकेट्स घेतल्या हे मला आठवणार देखील नाही.” त्याच्या यशाचे रहस्य सांगताना अक्षर पटेल म्हणाला, “मी थोडी हळू गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या गोलंदाजीत बदल करत आहे. आता मी या गोष्टी चांगल्या प्रकारे कसे होतील, यावर प्रयत्न करत आहे. मला पॉवर प्लेमध्येही गोलंदाजी करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.”

अक्षर पटेलने केला पराक्रम
टी-२० मध्ये (आंतरराष्ट्रीय आणि लीगसह) २०० विकेट्स पूर्ण करणारा अक्षर हा ११ वा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या वर हर्षल पटेल (२०९ विकेट्स), रवींद्र जडेजा (२१६ विकेट्स), जयदेव उनाडकट (२१८ विकेट्स), हरभजन सिंग (२३५ विकेट्स), जसप्रीत बुमराह (२६० विकेट्स), अमित मिश्रा (२८४ विकेट्स), भुवनेश्वर कुमार (२८८ विकेट्स) आहेत. , रविचंद्रन अश्विन (३०१ विकेट्स), पीयूष चावला (३०२ विकेट्स) आणि युजवेंद्र चहल (३३६ विकेट्स). अक्षरने २३४ व्या सामन्यात २०० टी-२० विकेट्स पूर्ण केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ६.९७ आहे.त्याचवेळी, अक्षरने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आतापर्यंत ४९ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये तो नवव्या क्रमांकावर आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here