मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला कात्रजचा घाट दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यामुळे नाराज अजित पवार पुन्हा एकदा कोणता मोठा निर्णय घेणार का? इथपर्यंत ही चर्चा जाऊन पोहोचली होती. मात्र, आता या नाराजीचा सर्व उलगडा बुधवारी ( ४ ऑक्टोबर) झाला आहे. राज्यातील सुधारित पालकमंत्री जाहीर करण्यात आले असून अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यात पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आले आहे तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे अनिल पाटील यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे. नंदुरबारचे डॉ. विजयकुमार गावित यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे.
पालकमंत्री पदासाठीची यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर मनासारखा जिल्हा न मिळाल्यामुळे अजित पवार, दादा भुसे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. पुण्याचे पालकमंत्रिपद जरी चंद्रकांत पाटील यांच्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसत होते. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून दोघांमध्ये अनेकदा चढाओढ पाहायला मिळाली.
राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवारांनी गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला जाण्याचं टाळले. तसेच मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आणि अनेक महिन्यांपासून रखडलेला पालकमंत्री पदाचा तिढा सुटला
राज्यातील बारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद बदलले आहे. या यादीमध्ये पूर्णतः अजित पवार गटाचा वरचष्मा राहिला आहे. या यादीमध्ये अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर पुण्यातून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करून त्या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबाबदारी घेतली आहे. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांना दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर कोल्हापूरमधूनही शिंदे गटाची उचलबांगडी करण्यात आली आहे. याठिकाणी दीपक केसरकर यांना पालकमंत्री पदावरून बाजूला करून त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्यांच्या बीड जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आलं आहे.
तीन जिल्ह्यातील तिढा कायम
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रीपदामध्ये सर्वाधिक चर्चा रायगडच्या पालकमंत्री पदावरून रंगली होती. त्या ठिकाणी शिंदे गटाने केलेल्या दाव्यामुळे त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाणार कोणाकडे याची चर्चा अजूनही आहे. रायगड जिल्ह्यासह सातारा आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे एकंदरीत या जिल्ह्यावरून तिन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा धुमशान होण्याची चिन्हे आहेत.
१२ जिल्ह्यांचे नवे पालकमंत्री
पुणे- अजित पवार,अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील,सोलापूर- चंद्रकांतदादा पाटील,अमरावती- चंद्रकांतदादा पाटील,भंडारा- विजयकुमार गावित,बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील,कोल्हापूर- हसन मुश्रीफ,गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम,बीड- धनंजय मुंडे,परभणी- संजय बनसोडे,नंदुरबार- अनिल भाईदास पाटील,वर्धा – सुधीर मुनगंटीवार
महामंडळ वाटपाचाही फॉर्म्युला ठरला
पालकमंत्रीपदानंतर महामंडळ वाटपाचाही महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या प्रस्तावानुसार शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी २५ महामंडळे देण्याचा प्रस्ताव असून भाजपकडे ५० महामंडळे ठेवण्यात येणार आहे. तर, शिंदे गटाला भाजपचा प्रस्ताव अमान्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटाने महामंडळ वाटपासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ३० आणि भाजपला ४० महामंडळे मिळावीत असा फॉर्म्युला निश्चित केला आहे. येत्या आठवड्यात महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जेवढी महामंडळ मिळतील तेवढीच महामंडळे राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली असल्याचे सूत्रांनी म्हटले.