पुणे ः प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.त्याबद्दल केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी भाष्य केले. केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह आज केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यासाठी पुण्यात आले होते.
यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला. “अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत.अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला”, असे विधान अमित शाह यांंनी केले. अमित शाह यांनी भाषणाला सुरुवात करताच अजितदादांचा उल्लेख करून त्यांंनी इथे (भाजपासमवेत) यायला उशीर केला असल्याची टिप्पणी केली तसेच तुम्ही आता योग्य ठिकाणी येऊन बसला आहात, असे सांगितले. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर अजित पवार यांनी आपल्या जागेवरून हात जोडून अमित शाह यांना अभिवादन केले.तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे बरेच कौतुक केले.तसेच मी वेगळा निर्णय घेण्यामागे काय कारणे आहेत, असा अनेकांना प्रश्न पडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेच देशाचे नेतृत्व करू शकतात. त्यामुळेच मी मोठा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.