जळगाव ः प्रतिनिधी
पाचोरा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी ठिकठिकाणी पुष्पगुच्छ देऊन होत असलेल्या स्वागताला वैतागून नाराजी व्यक्त केली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लगेच ही प्रथा मोडीत काढली आहे. यापुढे शासकीय कार्यक्रमात प्रत्येक मान्यवरांचे स्वागत पुस्तके, ग्रंथ देऊनच करावे, असा आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु झाली केली आहे.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यशदा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या क्लासेससाठी उपयुक्त पुस्तकांची यादी उपलब्ध केली आहे. ती ऐच्छिक आहे. तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे नोडल ऑफिसर म्हणून नेमले आहे. तालुकास्तरील अधिकाऱ्यांनाही उपयुक्त पुस्तक उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यापुढे ती भेट देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच मान्यवरांसह विविध संस्थाकडून उपलब्ध होणारी पुस्तके जिल्हा ग्रंथालयामार्फत ग्रामीण भागातील वाचनालय, अभ्यास केंद्र आणि विद्यार्थ्यांना मोफत पुरविली जाणार आहे. त्यात शाहू, फुले, आंबेडकर ग्राम अभ्यासिका, युपीएससी, एमपीएससी, सार्वजनिक प्रशासन, भारतीय इतिहासाच्या पुस्तकांचा समावेश आहे. ही पुस्तके जिल्ह्यातील अभ्यासकेंद्रे आणि ग्रंथालयांना भेट देण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे, कार्यक्रमानंतर हारतुरे, पुष्पगुच्छ फेकावी लागतात. त्यामुळे खर्चही वाया जातो. हा खर्च सार्थकी लागावा आणि पुस्तके माणसाला रद्दी होण्यापासून वाचवितात हा विचार रुजत जावा, यादृष्मटीने हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.