गिरीश महाजनानंतर आता देवेंद्र फडणवीस टार्गेटवर?

0
52

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत नाचताना शिवसेना उबाठा गटाचे नशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला होता. याप्रकरणी आता पोलिसांकडून खोलात जाऊन चौकशी देखील सुरु आहे मात्र आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवा फोटो समोर आणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.
सुधाकर बडगुजर ज्या पार्टीमध्ये नाचत होते ती भाजपच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.या पार्टीत भाजपच्या माथाडी कामगार संघटनेचा शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे याचाही समावेश असल्याचे संजय राऊत यांन म्हटले आहे. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जात आहे. नाशिक पोलिसांकडूनदेखील या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. त्या पार्टीच्या व्हिडिओमध्ये दिसून येत असलेल्या बहुतेकांची चौकशी आतापर्यंत करण्यात आली आहे.आता भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव समोर आल्याने संजय राऊत यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.
“मकाऊचा व्हिडीओ बडगुजर यांच्या कुटुंबियांनी दिला म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. आपला कायदा अशा पद्धतीने काम करतो? मुळात तो व्हिडीओ बडगुजर यांच्याकडून आलेला नाही. बाळासाहेब ठाकरेंची मी शपथ घेऊन सांगतोत,त्या व्हिडीओशी सुधाकर बडगुजर यांचा संबंध नाही. भाजपवाल्यांनी विचारायला हवे की, तो व्हिडीओ कोणी दिला. हा व्हिडीओ आमच्यापर्यंत कसा आला हे भाजप आणि संघ परिवाराला माहिती आहे. नागपुरच्या लोकांना माहिती आहे कोणी दिला. ती पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती. त्या पार्टीचे यांना आमंत्रण दिले होते. त्या संबंधित गुन्हेगाराला कोणी सोडले? तेव्हा गृहमंत्री कोण होते याची चौकशी करा. जर तो बॉम्बस्फोटातला आरोपी होता तर त्याला तुरुगांच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याने दिली. गृहमंत्र्यांच्या सहीशिवाय अशा प्रकारच्या आरोपीला कोणी सोडतं का, याचा तपास भाजपने करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“यावेळी गुन्हेगारासोबतचे फोटो व्हायरल झाल्याचे प्रसारमाध्यमांनी विचारताच संजय राऊत यांनी एक फोटो दाखवला. त्यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले की, व्हायरल कशाला हे पाहा. आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी आहे. नाशिकमधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने इतर पक्षातल्या लोकांसाठी जेवण आयोजित केले असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणे. भाजपमधले सलीम कुत्ताचे सहकारी जे प्रश्न विचारत आहेत त्यांनी आधी आपल्याकडे पाहावे, असेही संजय राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here