ग्रा.पं.मध्ये बबनरावांना आसमान दाखवल्यानंतर आता ठाकरेंना बळ

0
13
श्रीगोंदा, अहमदनगर : वृत्तसंस्था
नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा या तालुक्यावर गेल्या अनेक वर्षांपासून एकच नेता सत्ता गाजवतोय... ते नाव म्हणजे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते.... जनता पक्षाचे आमदार म्हणून 1980 मध्ये पहिल्यांदा त्यांचा विधानसभेत प्रवेश झाला. पुढे बबनराव पक्ष बदलत राहिले, सात वेळा सात चिन्हांवर निवडून येण्याचा त्यांच्या नावावर विक्रम आहे. 2014 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता याच बबनरावांना आव्हान देण्यासाठी एका तरुणाचे नाव समोर येत आहे. यात विशेष गोष्ट अशी की, त्यांचाच पुतण्या त्यांच्याविरोधात मैदानात उभा ठाकणार आहे. 
साजन पाचपुते.... भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचा पुतण्या.... साजन पाचपुते हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेल्याने श्रीगोंद्यात आता पाचपुते विरुद्ध पाचपुते असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राज्यात आणखी एका काका विरुद्ध पुतण्याची राजकीय लढत पाहायला मिळू शकते.
कोण आहेत साजन पाचपुते?
आमदार बबनराव पाचपुते यांचे साजन पुतणे आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत सदाशिव पाचपुते यांचे ते सुपुत्र आहेत.साजन पाचपुते श्रीगोंद्याच्या काष्टी गावचे सरपंच आहेत.श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत त्यांनी काका गटाविरोधात निवडणूक लढली आणि जिंकली.गावचे सरपंच आणि बाजार समितीचे संचालक असूनही ते अद्याप कुठल्याही पक्षात नव्हते.तालुक्याच्या ठिकाणी साजन पाचपुते यांची मजबूत ताकद आहे आणि श्रीगोंद्यावरही पकड आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.आता साजन पाचपुतेंमुळे श्रीगोंदा तालुक्यात ठाकरेंची आणखी ताकद वाढणार आहे.
आता एवढ्या दिवसांनंतर आणि तेही इतक्या राजकीय घडामोडींनंतर साजन यांनी ठाकरे गटाची निवड करुन एकप्रकारे काकांनाच आव्हान दिले आहे. साजन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबरोबर ठाकरेंनी त्यांच्यावर उपनेतेपदाची मोठी जबाबदारी दिली. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि भाजपचे वर्चस्व वाढत असलेल्या नगर जिल्ह्यात ठाकरेंची शिवसेना पिछाडीवर पडली होती.त्यादृष्टीने तरुण आणि युवा चेहरा म्हणून साजन आपली छाप उमटवू शकतात. त्यांच्या रुपाने श्रीगोंद्याला सेनेचा पहिला आमदारही मिळू शकतो, अशीही चर्चा आहे.तसेच जिल्ह्याच्या दक्षिण भागालाही नवे तरुण नेतृत्व मिळाले आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत पुतण्या काकांना भारी पडतो की आणखी काय नवं समीकरण तयार होते, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here