नाशिक जिल्ह्यात यंदा २०० टँकर्सचा प्रशासकीय अंदाज

0
15

 

नाशिक जिल्ह्यात यंदा २०० टँकर्सचा प्रशासकीय अंदाज

नाशिक ( प्रतिनिधी)-

जिल्हा प्रशासनाने यंदा चांगला पाऊस झाल्याने गतवर्षाच्या तुलनेत टँकरला कमी मागणी राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तरीही गतवर्षाच्या टंचाईचा अंदाज घेत यंदा २०० टँकरचे व ८ कोटी रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.

सिन्नर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा भागातील वाड्या वस्त्यांवर टंचाईच्या झळा जाणवतात. यंदा त्या में अखेरपासून वाढण्याची चिन्हे आहेत. इगतपुरीला पाण्यासाठी महिलांनी मोर्चा काढल्याने एक टँकर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यंदा जिल्ह्यातील ४८४ गावे व ५६७ वाड्यांना १४७ टँकरचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ४६ गावांमध्ये विंधन विहिरी अधिग्रहण करण्यासाठी २० लाख ७० हजार, तर १४६ गावांतील खासगी विहीर अधिग्रहण करण्यासाठी ९५ लाख ३१ हजार रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. ८१४ ठिकाणी टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ७कोटी ७० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील मोठ्या ७, मध्यम १७ धरणांमध्ये ४५ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरण समूहात ५९.४० टक्के पाणीसाठा आहे. एप्रिल व मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनामुळे धरण साठ्यात घट होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी कमी होऊन सार्वजनिक विहिरी, विंधन विहिरींची पाणीपातळी देखील कमी होण्याची शक्यता असल्याने वाड्या वस्त्यांना टँकरची गरज भासण्याची शक्यता आहे.

टँकर्सची संख्या गेल्यावर्षी पहिल्यांदा ४०० पर्यंत पोहोचली होती. जिल्ह्यात ३६६ गावे आणि ९४१ वाड्यांवरील ७ लाख २० हजार ३७२ लोकांना १३०७ ठिकाणी ३९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. गतवर्षी सर्वाधिक ७२ टँकर नांदगाव तालुक्यात सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here