हांगझोऊ : वृत्तसंस्था
भारताची स्टार महिला गोल्फपटू अदिती अशोकने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला.रविवारी (१ ऑक्टोबर) तिने ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात कोणतेही पदक जिंकणारी आदिती ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.या स्पर्धेच्या या आवृत्तीत गोल्फमध्ये भारताचे हे पदक आहे.सुवर्णपदक जिंकण्यापासून ती नक्कीच हुकली पण तिने एक मोठी कामगिरी करत आपल्या नावावर ऐतिहासिक नोंद केली.
अदितीला रविवारी महिला गोल्फ स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आपली लय राखता आली नाही. तिने अप्रतिम फटका मारला मात्र, तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अदितीने तिसऱ्या फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर सात शॉट्सची मोठी आघाडी घेतली होती. एका बर्डीविरुद्ध चार बोगी आणि एक दुहेरी बोगी करून तिने ही आघाडी गमावली आणि दुसऱ्या स्थानावर घसरली. अदिती सुवर्णपदकापासून वंचित राहिली पण दोन वेळच्या ऑलिम्पियन खेळाडूने अदितीला हरवले. टोकियो ऑलिम्पिकमध्येही ती थोड्या फरकाने मागे राहून चौथ्या स्थानावर राहिली होती.
जपानमध्ये झालेल्या २०२१ मधील ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरीमुळे अदिती अशोक ही चर्चेत आली होती. त्यावेळी अदितीला काही गुणांच्या फरकाने पदकाने हुलकावणी दिली होती मात्र कामगिरीत सातत्य ठेवत अदितीने आशियाई क्रीडा स्पर्धेेत इतिहास रचला.आता तिला सुवर्णपदकाने जरी हुलकावणी दिली असली तरी रौप्यपदक पटकावत अदितीने नव्या इतिहासाला गवसणी घातली आहे.
भारताचे गोल्फमधील
चौथे वैयक्तिक पदक
भारताचे गोल्फमधील हे चौथे वैयक्तिक पदक ठरले. लक्ष्मण सिंग आणि शिव कपूर यांनी १९८२ आणि २००२ च्या हंगामात सुवर्णपदक जिंकले तर राजीव मेहता यांनी नवी दिल्ली (१९८२) मध्ये रौप्यपदक जिंकले. लक्ष्मण, राजीव, ऋषी नारायण आणि अमित लुथरा यांच्या भारतीय संघाने १९८२ मध्ये सांघिक सुवर्णपदक जिंकले होते. २००६ आणि २०१०च्या मोसमात दोहा आणि ग्वांगझू येथे झालेल्या सांघिक स्पर्धेत भारताने रौप्य पदक जिंकले होते.



