आधार व्हेरिफिकेशन, हयातीचे दाखले आता गावातच मिळणार
यावल प्रतिनिधी
यावल तालुक्यात आता आधार व्हेरिफिकेशन आणि हयातीचे दाखले यांसारख्या आवश्यक कागदपत्रांची सुविधा गावपातळीवरच उपलब्ध होणार आहे
या महत्त्वाच्या सेवांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचा यामध्ये बराच वेळ आणि पैसा खर्च होतो. वृद्ध, दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार अमोल जावळे यांनी पाऊल उचलले आहे.
आमदार जावळे यांनी रावेर तहसील कार्यालयात व्हिडिओ कॉलद्वारे काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. लाभार्थ्यांनी त्यांना या समस्यांविषयी माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून आमदार जावळे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की, या सुविधा आता गावपातळीवरच सुरू करण्यात याव्यात. ग्रामपंचायत कार्यालये, आपले सरकार सेवा केंद्रे किंवा मोबाईल कॅम्पच्या माध्यमातून नागरिकांना ही सेवा उपलब्ध करून द्यावी. या उपक्रमाची जनजागृती करण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिली आहे.