अक्कलकोट : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपुर्वीच काँंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता भाजपकडून कांँग्रेसला खिंडार पाडण्याची तयारी सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. आपल्याला भाजपकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट खुद्द काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या
आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हूरडा पार्टी दरम्यान सुशिलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझा दोन वेळा पराभव झाला असला तरीही प्रणिती किंवा मला भाजप या असे म्हणत आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले मात्र पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस आमच्या रक्तात आहे,आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असे स्पष्टीकरणही दिले.
प्रणिती किंवा मला भाजपमध्ये या म्हणत आहेत पण आता ते कसे शक्य आहे. ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो, जिथे आमचं बालपण, तारुण्य गेलं. आता मी 83 वर्षाचा आहे त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणणार? त्यात प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही हे तुम्हाला माहिती आहे, असे ते कार्यकर्त्यांना म्हणाले.
राजकारणामध्ये असे होतं राहते. पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असे झाले. त्यांचा पराभव झाला होता. त्या पराभवाबाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते, लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो पुन्हा उठतो. मग तो चालायला लागतो आणि जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही, असे म्हणत त्यांनी नेहरुंचे उदाहरण दिले.
माणसाला त्रास होतो पण पुन्हा शक्ती मिळते. तुम्ही काहीही काळजी करू नका. आज वाईट दिवस आहेत मात्र ते दिवस निघून जातील. आपल्याला पुन्हा वैभवाचे दिवस येतील. याविषयी माझ्या मनामध्ये खात्री असल्याचे सुशीलकुमार शिंदेंनी यावेळी म्हटले.