वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याबद्दल इतिहासकारांची समिती नेमा – खासदार उदयनराजे भोसले
मुंबई (प्रतिनिधी)-
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याबद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी इतिहासकारांची समिती नेमण्याची मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी करत राज्य सरकारला ३१ मेपर्यंत निर्णय घ्यावा, असा आग्रह धरला आहे. मात्र, त्यांच्या या मागणीला धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध दर्शवला. या वादानंतर इतिहासकारांनी आणि सामाजिक नेत्यांनी मतं मांडली आहेत.
भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी इतिहासकारांची समिती नेमली जावी. ही समिती चौकशी करून सत्यता तपासून निर्णय घेईल. इतिहासात वाघ्या कुत्र्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे या समाधीबाबत अभ्यास करूनच योग्य निर्णय घ्यावा,” असे उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या सन्मानासाठी विशेष कायदा करण्याची गरज असल्याचे सांगितले. “आज समाजात विकृती वाढत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. यावर आळा घालण्यासाठी तातडीने विशेष कायदा करण्याची आवश्यकता आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तातडीने हे विधेयक मंजूर करावे, ती समाधी कधी आली? का आली? याचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्यावा.” असे ते म्हणाले.