विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
एबीपी माझा वृत्तवाहिनीने पत्रकार कृष्णा अविनाश केंडे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद अभ्यासक्रमासाठी पीएचडी पदवी बहाल केली आहे. कृष्णा केंडे यांनी एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रेखा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वृत्तवाहिन्यांचा समाज जीवनावर होणारा परिणाम: मराठी वृत्तवाहिन्यांचा विशेष अभ्यास’ या विषयावर संशोधन केले आहे. या संशोधनातून त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रेक्षकांशी निगडित अनेक बाबींचा उलगडा केला आहे. त्यात असे दिसून आले की, सुमारे 61 टक्के प्रेक्षक हे दिवसातून 2 तास वृत्तवाहिनी बघतात. तर, वृत्तवाहिन्यांवरील 75 टक्के बातम्या विश्वासार्ह असतात. 25 टक्के बातम्या अविश्वसनीय असण्याची एकांगीपणा, राजकीय दबाव, प्रेक्षकांची अज्ञानता तसेच आचारसंहितेचा अभाव ही कारणे आहेत. तर वृत्तवाहिन्यांचा तबाबल 75.67 टक्के प्रेक्षकांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे संशोधनात सिध्द झाले आहे.
कृष्णा केंडे हे 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे औरंगाबाद विभागाचे ते प्रमुख आहेत. त्यांच्या या यशाबद्दल एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर , खासदार तथा जेष्ठ पत्रकार कुमार केतकर ,जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ.दिनकर माने यांच्यासह औरंगाबाद शहरातील ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
