मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधव अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहेत.या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉ विवेक सोनवणे यांनी वेळोवेळी निवेदने देऊन दिव्यांग बांधवांच्या समस्या शासनदरबारी मांडल्या.त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी विविध कार्यालयांना आदेश दिले परंतु अद्यापही दिव्यांग बांधवांपर्यंत सदरच्या शासकीय योजना पोहोचू शकलेल्या नाहीत.त्याचा निषेध म्हणून प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी जळगाव येथील स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दिव्यांग बांधवांचा भव्य जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या मोर्चात जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉ.विवेक सोनवणे यांनी केले आहे .
दरम्यान या संदर्भात डॉ सोनवणे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे वीस जानेवारी रोजी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासन दरवर्षी दिव्यांग बांधवांसाठी जवळपास पंधराशे कोटी रुपयांचा निधी खर्च करते परंतु प्रशासनातील काही निगरगट्ट अधिकारी व कर्मचार्यांमुळे याचा लाभ दिव्यांग बांधवांना होत नाही.शासनाने दिव्यांग बांधवांसाठी जे निर्णय अस्तित्वात आणले ते फक्त अधिकार्यांच्या टेबलावरच धुळखात पडून आहेत,त्यांचा फायदा प्रत्यक्षात मात्र दिव्यांगांना होत नाही.विशेष खेदाची बाब म्हणजे दिव्यांग व्यक्ती हक्क दोन हजार सोळा नुसार तालुका स्तरावर गटविकास अधिकारी व जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जीप यांच्याकडे दिव्यांग बांधवांच्या तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सदर समितीची बैठक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला घेण्याचे आदेश असताना तसेच दिव्यांग बांधवांच्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात आदेश असताना तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे दिव्यांगांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. दिव्यांगांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात यासाठी डॉ.विवेक सोनवणे यांनी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते.
यानंतर तीन डिसेंबर दोन हजार वीस रोजी जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा त्यांनी उपोषण केले होते याची दखल जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांनी घेत जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनाशासकीय नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले परंतु त्याबाबत अद्यापही शासकीय पातळीवर अंमलबजावणी होत नसल्यामुळे अखेर दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या संघटनेच्यावतीने डॉ विवेक सोनवणे यांच्या नेतृत्त्वाखाली जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे त्या मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहनही डॉ सोनवणे यांनी केले आहे.