मुंबई : गोव्यात शिवसेनेचा पराभव ठरला आहे. शिवसेनेचं तिथे डिपॉझिट जरी वाचलं तरी संजय राऊत सांगतील त्या ठिकाणी मी चहा आणि जेवण देईल, असे थेट आव्हान भाजप नेते अशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिले होते. त्यावर आज राऊतांनी प्रत्युत्तर दिले. शेलारांना मी नेहमीच चहा पाजत असतो, असं सांगतानाच डिपॉझिट जप्त झाले म्हणजे लढूच नये, असे होत नाही. तसेच मराठा साम्राज्याचा मूलमंत्रही शेलार यांना ऐकवला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पानिपतच्या युद्धात दत्ताजी शिंदे जखमी होऊन पडले. तरीही शेवटपर्यंत म्हणत होते बचेंगे तो और भी लढेंगे. आम्ही लढणारे लोक आहोत. तुमच्या सारखे भ्रष्ट माफीया व्याभिचारींना तिकीट दिले असते तर आम्ही कधीचेच निवडणुकीच्या मैदानात जिंकलो असतो, असा हल्लाबोल राऊत यांनी शेलारांवर चढवला.
१९८९पासून भाजप गोव्यात काम करत असतानाही सलग दोन निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. डिपॉझिट जप्त झाले म्हणजे लढूच नये, असे होत नाही. असे निवडणूक आयोगानेही म्हटलेले नाही. पक्ष वाढवण्यासाठी लढावं लागतं. आमचे डिपॉझिट जप्त झाले तरी लढत राहू. बचेंगे तो और भी लढेंगे हा मराठा साम्राज्याचा मंत्र आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.