भुसावळ : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ७ मार्चला भुसावळ स्पोर्टस अॅन्ड रनर्स असोशिएशनतर्फे महिलांसाठी रनचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मर्यादित महिलांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तीन, पाच व दहा किमी अंतरासाठी रनचे आयोजन केले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ. नीलिमा नेहेते व डॉ. चारूलता पाटील यांनी दिली.
सुशिलाबाई नामदेव फालक विद्यालयात शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन झाले. यावेळी भुसावळ स्पोर्टस अॅन्ड रनर्स असोशिएशनचे अध्यक्ष प्रा. प्रवीण फालक, प्रवीण पाटील, डॉ. तुषार पाटील, डॉ. निलीमा नेहेते, डॉ. चारूलता पाटील, गणसिंग पाटील, रणजित खरारे, प्रवीण वारके आदी उपस्थित होते.
माहिती देतांनाडॉ. चारूलता पाटील, डॉ. नीलिमा नेहेते. प्रा . प्रवीण फालक, यांनी सांगितले की, ७ मार्चला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून रनला सुरूवात होईल. तीन, पाच व दहा किमी या तिन्ही प्रकारांमध्ये प्रत्येकी २०० अशाप्रकारे ६०० महिलांना प्रवेश दिला जाणार आहे. २६ जानेवारीपासून ऑनलाइन नावनोंदणी केली जाणार आहे. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, मेडल आणि टी-शर्ट दिले जाईल, अशी माहिती देण्यात आली.
७ मार्चपर्यंत पालिकेकडून रस्त्यांवरील खड्डे बुजवले न गेल्यास नाईलाजास्तव रनचा मार्ग बदलला जाईल. यावर पर्यायी मार्ग डॉ. आंबेडकर मैदान ते आयुध निर्माणीपर्यंत असेल. अन्यथा डॉ. आंबेडकर मैदान ते नाहाटा कॉलेज हा मार्ग असेल, १० किमीसाठी महिला रर्नस रवाना झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाच किमी व नंतर तीन किमी अंतराच्या स्पर्धकांना सोडले जाईल. स्पर्धेसाठी भुसावळ स्पोर्टस अॅण्ड रनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
१४ फेब्रुवारीला सायकलिंग चॅलेंज
असोसिएशनतर्फे आगामी १४ फेब्रुवारीला सायकलिंग सातपुडा चॅलेंजचे आयोजन केले आहे. यात भुसावळ ते पाल १०० किमी आणि भुसावळ ते खिरोदा ५० किमी रिटर्न असे अंतर आहे. २५ जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणी होईल. १०० किमी साठी साडेआठ तास तर ५० किमीसाठी साडेतीन तास वेळ असेल. डॉ. आंबेडकर मैदानापासून सायकलिंगला प्रारंभ होईल, असे प्रा . प्रवीण फालक यांनी सांगितले.
