गडचिरोली : गडचिरोली नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले . या निवडणुकीत शिवसेनेलामोठा फटका बसला आहे. तर काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे.
राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. नगरपंचायत निवडणुकीसाठी (Nagar Panchayat elections) शिंदे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण जिल्ह्यात पदांची खिरापत वाटल्यामुळे शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला. मागली वेळेच्या तुलनेत यावेळी शिवसेनेला फक्त २ जागा अधिक मिळाल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी गडचिरोलिचे नियमित दौरेही केले होते. शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनाही त्यांनी आवाहन केले होते. पण एकाच जिल्ह्यासाठी ३ जिल्हाप्रमुख, एक संपर्कप्रमुख आणि एक जिल्हा समन्वयक, अशा पाच जणांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवल्यामुळेही शिवसनेच्या पदरी निराशाच पडली.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील धानोरा आणि चामोर्शी मध्ये तर शिवसेनेला एकाही जागेवर खाते उघडता आले नाही.
आरमोरी आणि कुरखेड्यामध्ये जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांचे चांगले वजन आहे. कुरखेड्यात शिवसेनेने ५ जागा जिंकल्या. मात्र याठिकाणीही भाजपने मुसंडी मारत ९ जागांवर आपले वर्चस्व प्रथापित केले. तर या ठिकणी राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला. अहेरी विधानसभा मतदारसंघात सिरोंचा येथे शिवसेनेने केवळ २ जागा जिंकल्या. पर्कप्रमुख किशोर पोतदार आणि जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी जास्तीत जास्त अहेरीत दौरे केले. त्याचे फळ म्हणून मुलचेरामध्ये सेनेला ४ जागा मिळाल्या. भामरागडमध्ये फक्त १ जागाच शिवसनेच्या पदरात पडली.
दरम्यान राज्यात शिवसेना सत्तेत आहे. मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच आहे. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्रीही शिवसेनेचेच आहे. त्या दृष्टीने पाहता गडचिरोली नगरपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेनेला चांगली कामगिरी करता आली नाही.
