ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचची निराशा!; न्यायालयाने अर्ज फेटाळल्यामुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला मुकणार

0
13

न्यायालयाने अर्ज फेटाळल्यामुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला मुकणार

ऑस्ट्रेलियातील केंद्रीय न्यायालयाने परत पाठवणीविरोधातील अर्ज फेटाळल्याने प्रचंड निराशा झाल्याची कबुली विश्वातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी दिली.

करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस न घेताच ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या सर्बियाच्या जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियाचे परकी नागरिकविषयक खात्याचे मंत्री (इमिग्रेशन मिनिस्टर) अ‍ॅलेक्स हॉक यांनी शुक्रवारी रद्द केला होता. त्याने या निर्णयाविरोधात दाद मागितली. मात्र, रविवारी केंद्रीय न्यायालयाच्या तिन्ही न्यायाधीशांनी एकमताने जोकोव्हिचच्या विरोधात निकाल दिला. हॉक यांनी उचलेले पाऊल हे ‘तर्कहीन किंवा कायदेशीरदृष्ट्या अवास्तव’ होते का, याबाबत विचार केल्यानंतर आम्ही जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवल्याचे सरन्यायाधीश जेम्स ऑलसोप यांनी स्पष्ट केले. केंद्रीय न्यायालयाच्या या निर्णयानंतर जोकोव्हिचला उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा होती. मात्र, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला केवळ एका दिवसाचा अवधी असल्याने त्याने केंद्रीय न्यायालयाचा निर्णय स्वीकारला.

‘‘मंत्र्यांनी माझा व्हिसा रद्द केला. त्यामुळे मला ऑस्ट्रेलियात थांबण्याची आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेत खेळण्याची परवानगी नव्हती. त्यांच्या या निर्णयाविरोधात मी न्यायालयात दाद मागितली, पण न्यायालयाने माझा अर्ज फेटाळला. या निर्णयाने मी खूप निराश आहे. मात्र, मला न्यायालयाच्या निर्णयाचा आदर असून देशातून बाहेर पडण्यासाठी मी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करेन,’’ असे जोकोव्हिच म्हणाला.

‘‘आता आपण सर्व जण खेळावर आणि माझ्या आवडत्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करू अशी मला आशा आहे,’’ असेही जोकोव्हिचने म्हटले आहे.  वैद्यकीय सवलत मिळाल्यावर जोकोव्हिच ६ जानेवारीला मेलबर्न येथे दाखल झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने त्याचा व्हिसा रद्द केला होता. १० जानेवारीला न्यायालयाने त्याचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय स्थगित केला होता. मात्र, परकी नागरिकविषयक खात्याचे मंत्री हॉक यांनी विशेष अधिकार वापरून १४ जानेवारीला जोकोव्हिचचा व्हिसा पुन्हा रद्द केला.

काही तासांतच मायदेशी रवाना

केंद्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांतच जोकोव्हिच मायदेशी परतण्यासाठी मेलबर्न विमानतळावर दाखल झाला. केंद्रीय अधिकाऱ्यांनी जोकोव्हिचला आणि त्याच्या साहाय्यकांना विश्रांतीगृहापासून प्रवेशद्वाराजवळ नेले. मग तो दुबईसाठी रवाना झाला. दुबईहून तो सर्बियात परतणार आहे. वैद्यकीय सवलत मिळाल्यावर दुबई मार्गेच जोकोव्हिच ६ जानेवारीला मेलबर्न येथे दाखल झाला होता.

‘ऑस्ट्रेलियन सरकारकडून छळवणूक’

बेलग्रेड : ऑस्ट्रेलियन सरकारकडून जोकोव्हिचची छळवणूक झाल्याचा आरोप सर्बियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर व्हूचिच यांनी केला आहे. ‘‘आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. जोकोव्हिचची दहा दिवस छळवणूक करत त्याला लाज आणल्याची ऑस्ट्रेलियन सरकारची भावना आहे. मात्र, या प्रकरणाने त्यांनी स्वत:लाच लाज आणली आहे,’’ असे व्हूचिच म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here