पहूर , ता .जामनेर ( प्रतिनिधी ) : – गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी असलेली पाचोरा जामनेर रेल्वे बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करत पीजे रेल्वे बचाव कृती समितीतर्फे आज शनिवारी पहूर येथे कॅप्टन दादासाहेब डॉ . एम . आर .लेले बस स्थानकासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले . या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला .
१०२ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेली पाचोरा जामनेर रेल्वे सेवा गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी आहे .पाचोरा व जामनेर या दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या या रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांची गरज भागविली आहे . परंतू शासन आणि प्रशासन स्तरावर सदर रेल्वे सेवा बंद करण्याचा घाट घातला जात असल्याने या निर्णयाविरोधात पाचोरा आणि जामनेर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाचोरा जामनेर रेल्वे बचाव कृती समिती स्थापन करून आज शनिवारी पहूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले .
या आंदोलनाप्रसंगी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा , माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , रेल्वे सेंट्रल बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील , उपसरपंच शाम सावळे , राजू महाराज , कंत्राटी कामगार आदींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्य .कोणत्याही परिस्थितीत सदर रेल्वे बंद पडू दिली जाणार नाही , रेल्वे रुळ कदापी उखडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे . सदर रेल्वे बंद झाल्यामुळे कंत्राटी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे .
या आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख , अॅड . एस . आर . पाटील , उपसरपंच शाम सावळे , राजू जाधव , लक्ष्मण गोरे , अशोक जाधव , शैलेश पाटील , रविंद्र मोरे , रविंद्र पांढरे , योगेश भडांगे , शरद पांढरे , ईश्वर बारी , योगेश बनकर , पत्रकार शांताराम लाठे , गणेश पांढरे यांच्या सह कंत्राटी कामगार , ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .