पुणे, वृत्तसंस्था । पुण्यातल्या मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे संचालक सुनील मेहता यांचं आज निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते व त्यांच्यावर पूना हॉस्पिटल इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हळूहळू अवयव निकामी होत गेल्याने त्यांचं निधन झालं.
गेल्या १५ दिवसांपासून मेहता हे पुण्यातल्या पूना हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनसाठी उपचार घेत होते. मात्र अवयव निकामी होत असल्याने त्यांना दोन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज संध्याकाळी ४ वाजता अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मेहता पब्लिशिंग हाऊसचे सीईओ आणि एमडी, सुनील अनिल मेहता यांनी १९८६ मध्ये त्यांचे वडील अनिल मेहता यांच्याकडून व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी अगदी लहान वयापासून मेहता पब्लिशिंग हाऊसचा पाया आणि वाढ पाहिली आणि काम शिकून घेतलं तसंच वडिलांकडून व्यवसायाची दोरी आपल्या हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची ताकद वाढली आहे. मराठीत परदेशी आणि प्रादेशिक पुस्तकांचे भाषांतर आणि प्रकाशन केलं, ई-बुक सेवा सुरू केली.