चाळीसगाव, प्रतिनिधी । पत्रकारीता करताना पत्रकारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. डिजिटल मिडियामुळे आज पत्रकारितेच्या व्याख्या बदलल्या असल्या तरी पत्रकारांच्या ज्या समस्या पूर्वी होत्या त्याच आज देखील कायम आहेत. चाळीसगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना त्यांच्या हक्काचे पत्रकार भवन मिळावे तसेच ज्येष्ठ पत्रकारांनी केलेल्या सूचना व त्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आगामी काळात सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून स्वतःचे घर नसलेल्या पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी नवीन म्हाडा योजनेत अल्पदरात प्राधान्याने घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, अशी घोषणा आ. मंगेश चव्हाण यांनी केली.
ते शिवनेरी फाउंडेशनतर्फे पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित चाळीसगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या सपत्नीक सत्कार सोहळ्यात बोलत होते. चाळीसगाव येथील आ.मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात आयोजित या सत्कार सोहळ्याला पत्रकार बांधवांना संसारात खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती यांना व्यासपीठावर स्थान देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आ.मंगेश चव्हाण व प्रतिभा चव्हाण यांच्याहस्ते चाळीसगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांचा भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, सचिव एम.बी. पाटील, रमेश जानराव, जिजाबराव वाघ, आनंद खरात, अजय कोतकर, देविदास पाटील, संजय सोनार, सोनार काका, मोतिलाल अहिरे, मनोहर कांडेकर, मुराद पटेल, रामलाल चौधरी, प्रशांत गायकवाड, सूर्यकांत कदम, गणेश पवार, निलेश परदेशी, राजेंद्र चौधरी, खुशाल बिडे, आकाश धुमाळ, रणधीर जाधव, संदीप पाटील, सुनील राजपूत, विजय सपकाळे, सोमनाथ माळी, विशाल कारडा, निलेश परदेशी, तारकेश्वर परदेशी, अजीज खाटीक, महेंद्र सूर्यवंशी, जीवन चव्हाण, यश पालवे यांच्यासह चाळीसगाव शहर व तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
आ.चव्हाण पुढे म्हणाले की, 15 ते 20 वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारीता पूर्णपणे बदलली असून आजच्या डिजिटल युगात ब्रेकिंग न्यूज क्षणात वाऱ्यासारखी पसरते. माझे मामा एम.बी.पाटील स्वतः पत्रकार असल्याने त्याकाळातील चाळीसगाव शहरातील जुने पत्रकार व त्यांचे काम जवळून पाहता आले आहे. मी जळगाव येथे डिप्लोमासाठी अपडाऊन करायचो तेव्हा त्यांची बातम्यांची पाकिटे घेऊन ती संंबंधित दैनिकाच्या कार्यालयात जमा करायचो. तेव्हाचे तरुण पत्रकार आता ज्येष्ठ झालेत. मात्र, त्यांनी ज्या हाल-अपेष्ठा सहन करून एक वैचारीक पत्रकारीता चाळीसगाव तालुक्यात जतन केली आहे त्याचा आदर्श आताच्या तरुण पत्रकार बांधवांनी घ्यावा, किंबहुना मी जर चांगले काम केले असेल तर त्याला चांगले म्हणा, पण मात्र मी कुठे चुकत असेल तर माझ्याविरुद्ध लिहायला सुद्धा मागेपुढे पाहू नका, अशी भावना देखील आ. मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
दरम्यान, चाळीसगाव तालुक्यात पत्रकार बांधवांचा सपत्नीक सत्काराचा कार्यक्रम प्रथमच आ.मंगेश चव्हाण आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता. याबद्दल सर्व पत्रकार बांधवांनी आ.मंगेश चव्हाण व सौ.प्रतिभा चव्हाण यांचे आभार मानले. या आगळ्या वेगळ्या सत्कार सोहळ्यात पत्रकार आर.डी.चौधरी, भिकन वाणी, आनंद खरात यांनी मनोगताच्या माध्यमातून पत्रकारांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या मागण्या आ.मंगेश चव्हाण यांच्याकडे मांडल्या. प्रास्ताविक भावेश कोठावदे यांनी केले. सूत्रसंचालन जितेंद्र वाघ यांनी केले तर आभार प्रतिभा चव्हाण यांनी मानले.