पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निधीच्या मदतीने जळगावात नवीन विकासपर्व सुरू : महापौर जयश्री महाजन

0
21

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहराची मध्यंतरीच्या काळात अतिशय दयनीय अवस्था झाली होती. मात्र, तरीही आता भरीव निधीच्या माध्यमातून जळगावचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आम्ही सुरू केलेले आहे. त्यामुळे आता जळगाव शहर बदलायला सुरूवात झाली असून, त्याचाच भाग म्हणून आज शनिवार, दि.8 जानेवारी 2022 रोजी पिंप्राळ्यातील विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व झालेल्या कामांचे लोकार्पण आपल्या सर्वांच्या साक्षीने होत आहे. यापुढील काळातही आपण जळगावच्या विकासासाठी सदैव वचनबद्ध राहू, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील यांनी दिली.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगरोत्थान तसेच दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत निधीतून उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांच्या पिंप्राळ्यातील प्रभाग क्र.10 मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व झालेल्या कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

याप्रसंगी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (जळगाव शहर-ग्रामीण, अमळनेर) विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडीच्या महानगरप्रमुख शोभा चौधरी, उपमहानगरप्रमुख ज्योती शिवदे, नगरसेवक प्रशांत नाईक, ललित कोल्हे, अमर जैन, शोभा बारी, सुरेश सोनवणे, विक्रम ऊर्फ गणेश सोनवणे, शेख हसीनाबी शरीफ, शिवसैनिक सरिता माळी-कोल्हे, निलू इंगळे, मंगला बारी यांच्यासह युवा सेना पदाधिकारी, शिवसैनिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन म्हणाल्या की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देऊन खर्‍या अर्थाने पालकत्वाची भूमिका बजावलेली आहे, हे आज या विकासकामांच्या माध्यमातून सिद्ध झालेले आहे. याचा अर्थ जळगावात नव्याने विकासपर्व सुरू झाले असून, आता निश्चितपणे जळगाव शहराचा कायापालट होईल, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. इतर प्रभागांतही गटारी, रस्त्यांची कामे सुरू झालेली आहेत.

उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, मी महापालिका निवडणुकीवेळी प्रभागातील जनतेला जो विकासकामांसंदर्भात शब्द दिला होता तो आदरणीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विक्रमी निधीच्या मदतीने आणि महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांसह शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने आज पूर्ण झालेला आहे, याचा विशेष आनंद आहे. आज नव्याने भूमिपूजन झालेली कामेही वेळेत पूर्ण होऊन संपूर्ण पिंप्राळा परिसराचा या माध्यमातून कायापालट होईल, याबाबत मला संपूर्ण विश्वास आहे. यावेळी नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here