जळगाव : साईमत चमूकडून
जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी आज सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर सुरुवात झाली. अगदी सकाळपासून मतमोजणी केंद्रावर ग्रामीण भागातून लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती. आज सकाळी जळगाव येथील नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात तालुक्याच्या ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस सुरुवात झाली. भादली येथील बहुचर्चीत तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील यांनी विजय संपादीत करत त्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी लोकप्रतिनिधी बनल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील यांना बोदवड तालुक्यातील मनुर या आपल्या गावी पुतण्याच्या पराभवाने धक्का बसला आहे.
तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आव्हान उभे करणार्या अंजली पाटील यांनी विजय मिळविला आहे. वार्ड क्रमांक ४ मधून तृतीयपंथी अंजली पाटील (अंजली जामन गुरु संजना जान) यांनी महिला राखीवमधून अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज तहसील कार्यालयाने नाकारल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तेथून त्यांना महिला वर्गवारीत अर्ज भरण्याची परवानगी मिळाली होती. यानंतर त्यांनी अतिशय जोराने प्रचार केला. वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या प्रचाराला आता यश लाभले आहे.
आज सकाळी झालेल्या मतमोजणीतून वॉर्ड क्र.४ मधून अंजली पाटील या विजयी झाल्या आहेत. त्या जिल्ह्यातील पहिल्या लोकप्रतिनिधी बनल्या आहेत.
साकेगाव ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व
भुसावळ तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या साकेगाव येथे भाजपच्या ग्रामविकास पॅनल विरुध्द राष्ट्रवादीच्या लोकमान्य ग्रामविकास पॅनलच्या चुरशीच्या लढतीत दोन्ही पॅनल प्रमुखांचा पराभव झाल्याने दोन्ही पॅनलला हादरा बसला आहे. १७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये १० जागी भाजपने विजय मिळवत निर्वावाद वर्चस्व राखले असून राष्ट्रवादीला ७ जागी यश आले आहे. दरम्यान, साकेगाव ग्रामपंचायतीची जबाबदारी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जि.प. गटनेते रविंद्र पाटील यांच्याकडे असल्याने या पराभवाने त्यांना जबर हादरा बसला आहे.
यात भाजपचे पॅनल प्रमुख माजी सरपंच अनिल पुंडलीक पाटील यांची सुमारे १५ वर्षापासून असलेली सत्ता उलथवत लोकमान्य ग्रामविकास पॅनलच्या साबीर पटेल यांनी त्यांचा धक्कादायक पराभव केला. तर लोकमान्य ग्रामविकास पॅनलचे प्रमुख निवृत्ती पवार यांना भाजपच्या ग्रामविकास पॅनलच्या तरुण उमेदवार स्वप्निल सपकाळे यांनी पराभवाची धुळ चारली. माजी सरपंच आनंदा ठाकरे यांनी आपला विजय अबाधीत ठेवला आहे. त्यांनी त्यांचे मामा सुधाकर सोनवणे यांचा दारूण पराभव केला. ग्रा.पं. नवनिर्वाचीत सदस्यांमध्ये दोन ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या मुलांचा समावेश आहे.
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील ग्रामपंचायतीत गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असणार्या शिवसेनेला निकालातून धक्का बसला असून राष्ट्रवादी व भाजपला येथे यश मिळाले आहे.
आज सकाळी लागलेल्या निकालातून नगरदेवळा या अतिशय महत्त्वाच्या गावात शिवसेनेला हादरा बसला आहे. येथे गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. यंदा मात्र निवडणूक अतिशय चुरशीची झाली. यात शिवसेनेला ७ तर भाजप व राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या आहेत.
तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात १७ जागांपैकी ९ जागी महाविकास पॅनलने विजय संपादन केला असून ग्रामविकास पॅनलला ८ जागा राखता आल्या आहेत. महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख म्हणून अक्षय जैसवाल यांनी काम पाहिले.
पिंपळगाव-हरेश्वर येथील ग्रा.पं. निवडणुकीत १७ पैकी १ जागा बिनविरोध निवडून आली होती. ही जागा नम्रता पॅनलची होती. आज लागलेल्या निकालात महाविकास आघाडीला १३ तर भाजपच्या वाट्यावर ४ जागा आल्या. याठिकाणी माजी सरपंच सुखदेव गिते यांनी सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे.
तालुक्यातील शिंदाड येथे सिध्देश्वर पॅनलने १० जागांवर यश संपादीत करत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. येथील स्वराज्य पॅनलचे प्रमुख शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ऍड. अभय पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून स्वराज्य पॅनलला ५ जागा राखता आल्या आहेत.
भालोद येथे अमोल जावळे यांच्या नेतृत्वात भाजपला यश
यावल तालुक्यातील भालोद ग्रामपंचायतीवर भाजपने निर्वावाद वर्चस्व राखत भाजपचे दिवंगत नेते हरीभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांच्या ग्रामविकास पॅनलने १५ पैकी ११ जागी विजय संपादन करत सत्ता मिळवीली आहे.
यावल तालुक्यात किनगांवात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला प्रतिसाद
तालुक्यात ४६ ग्रामपंचायतीच्या ३५९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी ७७.०३ टक्के मतदान झाले ती मतमोजणी आज दिनांक१८ सोमवार सकाळी दहा वाजेपासून यावल तहसील कार्यालयात शांततेत सुरू झाली.
तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायतीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत प्रभाग निहाय निकाल प्रभाग १- प्रमोद रामराव पाटील सर्वसाधारण (१४६), सायरा लडकी तडवी अनुसूचित जमाती महिला राखीव (१३३). प्रभाग २- किरण वसंत सोनवणे अनुसूचित जाती (४७२), लोकमान कलंदर तडवी अनुसूचित जमाती (४०८). प्रभाग ३- शेख महेमूद शेख रुस्तम सर्वसाधारण (५६१), तडवी अलनुरबि छबू अनुसूचित जमाती महिला राखीव (४६५), स्नेहल मिलिंद चौधरी नामाप्र महिला (४५१). प्रभाग ४- विजय अरुण वारे नामाप्र पुरुष (३८२), साधना राजेंद्र चौधरी सर्वसाधारण महिला (४५१), प्रमिलाबाई शामकांत पाटील सर्वसाधारण महिला (३४९). प्रभाग ५- आनंदा एकनाथ माळी सर्वसाधारण पुरुष (४६२), भारती प्रशांत पाटील सर्वसाधारण महिला (४०६), राजेंद्र धुडकू पाटील (३६५) याप्रकारे यावल तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायत उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केले.
दुपारी एक वाजेपयर्चंत लागलेल्या निकालात मारूळ, बामणोद, किनगाव, वढोदे प्र यावल, अट्रावल, दहीगाव, डोंगर कठोरो, हिंगोणा, कोळवद या ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व दिसून आले आहे. तर स्व. आ. हरीभाऊ जावळे यांच्या भालोद गावात भाजपला बहुमत मिळाले आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी यांच्या वनोलीतही भाजपचे वर्चस्व सिध्द झाले असून, भाजपच्या यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी रुरूजीत चौधरी यांचे पती व डांभुर्णी गावाचे विद्यमान सरपंच पुरूजीत गणेश चौधरी यांनी ग्रा.पं. निवडणुकीत घवघवीत यश मिळवून बहुमत मिळवले आहे.
सातोद ग्रा.पं. निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हर्षल गोवींदा पाटीलयांच्या भाजप प्रणीत प्रगती पॅनलने बहुमत मिळवले. राजोरा ग्र.पं. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व तर चिंचोली ग्रा.पं. निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना प्रणीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
या ग्रामपंचायत निवडणुकीत यावल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य शेखर सोपान पाटील यांच्या पत्नी दिपाली शेखर पाटील यांचा सावखेडा सिम ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पराभूत झाल्या. तर किनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आ.रमेश विठ्ठल चौधरी यांच्या सून मालती राजेंद्र चौधरी या विजयी झाल्या आहेत. बामणोद ग्रा.पं. निवडणुकीत भाजपचे माजी तालुका अध्यक्ष व माजी पंचायत समितीचे सभापती डॉ. नरेंद्र वामन कोल्हे यांच्या पत्नी सुवर्णलता नरेंद्र कोल्हे यांचा आणि त्यांच्या सुन सुजाता कोल्हे यांचा पराभव झाला आहे.
पहूर कसबे येथे भाजपाला स्पष्ट बहुमत
जामनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणार्या पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या लागलेल्या निकालामध्ये महाविकास आघाडीला ६ जागा मिळाल्या तर भाजपने पॅनला ९ जागा तर अपक्ष दोन जागेवर विजय मिळविला आहे.महाविकास आघाडीला ६ जागा भाजपा देवळी गोंगडी विकास पॅनलच्या नऊ जागेवर विजय तर अपक्ष दोन जागेवर विजय झाले आहे.
पहूर कसबे ग्रामपंचायतमध्ये आज लागलेला निकाल मध्ये देवळी गोगडी विकास पॅनल ९ जागा महाविकासआघाडी पॅनल सहा जागा अपक्ष दोन जागेवर विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे भाजपा पॅनलचे विजयी उमेदवार आशाबाई शंकर जाधव, योगेश भडांगे, तेजराज बाविस्कर, शेरखा निजाम तडवी, ज्योती धनगर, वासुदेव घोंगडे, जिजाबाई लहासे, निता लक्ष्मण गोरे, अनिता लहासे, महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार शिवसेना उपतालुका प्रमुख आशोक जाधव, विनोद थोरात, शिवाजी राऊत, कल्पना पवार, प्रतीमा बनकर, मनीषा युवराज चौधरी, अपक्ष विजयी उमेदवार राजू रामदास जाधव, विक्रम पंडित घोंगडे हे उमेदवार विजयी झाले आहे
रोटवद येथे ईश्वर चिठ्ठी मुळे भैया पाटील यांचे पॅनल विजयी
तालुक्यातील रोटवद येथे कुठल्याही पक्षाचे पॅनल नसून सुधीर भागवत पाटील (भैया) यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ईश्वर चिठ्ठी मुळे बाजी मारली. त्यांच्या पॅनलने ९ पैकी ५ जागांवर विजय संपादीत करत सत्ता मिळविली आहे. त्यांच्या पॅनल मध्ये सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते. आर.आर. पाटील व भरत पाटील यांच्यासह गावकर्यांचे सहकार्य लाभले असल्याचे मत भैया पाटील यांनी व्यक्त केले.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील ग्रामपंचायतीवर आज लागलेल्या निकालातून खडसे कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोथळी हे गाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे गाव आहे. त्यात ५ जागांवर शिवसेना पुरस्कृत उमेदवार निवडून आले आहेत, तर उर्वरित ६ जागांवर राष्ट्रवादी व भाजप समर्थक असलेले उमेदवार निवडून आलेले आहेत. शिसेना पुरस्कृत ५ उमेदवारांच्या विरोधात निवडून आलेले ६ उमेदवार हे आपले समर्थक असल्याचा दावा एकनाथ खडसेंच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. या ठिकाणी दोन्ही गटाला समसमान जागा मिळाल्याने सरपंच नेमका कोणत्या गटाचा असेल, याबाबत उत्सुकता आहे.
तहसील कार्यालयात मतमोजणी दरम्यान सुरक्षितेचा अभाव
स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम मशीन मतमोजणी स्थळी टेबलावर आणल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित गावचे प्रतिनिधी जमा होत आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जाळी किंवा सुरक्षितता दिसून येत नव्हते दोन बांबू लावल्यामुळे हात ईव्हीएम मशीन पर्यंत पोहोचत होते यावरून महसूल प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत होता
निकाल जाहीर करण्यासाठी तहसीलदार चार ते पाच फेर्या होऊन सुद्धा महसूल प्रशासनाचा ढिसाळ कारभार मुळे तब्बल दीड तास उलटूनही एकाही फेरीचा निकाल जाहीर करण्यात आलेला नव्हता. याबाबत महसूल प्रशासनाचा हेतू काय याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारची माहिती तहसीलदार श्वेता संचेती यांनी देण्यास असमर्थता व्यक्त केल्याने तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मतमोजणीसाठी कोणत्याही प्रकारचे सुस्थितीत नियोजन न करता केवळ बांबू व लोखंडी खांब आडवे टाकून मतमोजणी केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रसंगी जाळ्यांचा वापर व पार्टिशन विभागणी टेबल निहाय विभागणी न करता अतिशय मोकळ्या वातावरणात मतमोजणी केली जात होती. त्यातच कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंग व मास आणि सॅनिटायझर चा उपयोग देखील करण्यात येत नसल्याचे दिसून येत होते.
माजी सभापती तथा भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर यांच्या निमखेडी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने वर्चस्व मिळवत ९ पैकी ७ जागा पटकावल्या आहेत. तर एका जागी कॉंग्रेस व दशरथ कांडेलकर यांच्या वाटेला केवळ एक जागा मिळाली आहे.
अमळनेर तालुक्यात ३५ गावांचे निकाल जाहीर
अमळनेर येथील ग्राम पंचायत निवडणुकीच्या मत मोजणी इंदिरा भवन येथे सुरू झाली. ५ फेर्यांअंती ३५ गावांचे निकाल जाहीर झाले आहेत. अत्यंत शिस्तबद्ध मतमोजणी सुरू असून वेगात निकाल हाती येत आहेत. पोलीस प्रशासन पूर्ण बंदोबस्तात असून उपविभागीय पोलिस अधीक्षक राकेश जाधव,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मारवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या सह तहसीलदार मिलींदकुमार वाघ सह एकूण ९१ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत.
चाळीसगाव तालुक्यात महाविकास आघाडीला यश
तालुक्यातील ग्रामपंचायत मतमोजणीत भाजपला चांगलाच हादरा बसला असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जि.प.चे माजी शिक्षण समिती सभापती पोपट तात्या भोळे यांच्या वाघळी गावीच भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. येथे राष्ट्रवादीने १० जागा जिंकत सत्ता काबीज केली असून भाजपला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. वाघळी येथे राष्ट्रवादीचे अभय सोनवणे यांच्या नेतृत्वात सत्ता काबीज केली. दरम्यान, तालुक्यात सर्वचदूर राष्ट्रवादी तसेच आघाडीच्या उमेदवारांची सरशी होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
तालुक्यातील डोण येथे आ.मंगेश चव्हाण यांच्या भाजपच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. डोण हे आ.चव्हाण यांची सासरवाडी आहे. बोरखेडा व भोरस ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणीत पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरु असून दंडपिंपरी येथे भाजपच्या नाना पवार यांच्या नेतृत्वातील पॅनल विजयाकडे आहे. तर कुंझर येथे शिवसेनेची आघाडी असून टाकळी ग्रा.पं. मध्ये भाजप विजयाकडे आहे.
एरंडोल तालुक्यातील खडके खु॥ येथे ग्रा.पं. निवडणूकीत सुनेकडून सासूस पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत सायली राजेंद्र पाटील यांच्या चुलत सासू माजी सरपंच सिंधुबाई चंद्रसिंग पाटील यांचा पराभव केला. तर युवा सेनेचे तालुका प्रमुख घनश्याम पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांच्या पत्नी वैशाली पाटील या विजयी झाल्या आहेत.
बोदवड तालुक्यातील मनुर येथे झालेल्या चुरशीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील यांचे पुतणे तसेच माजी सरपंच पंजाबराव पाटील यांचे चिरंजीव सम्राट पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर विद्यमान सरपंच नर्मदाबाई ढाले यांचे पती गोविंद ढोले हे चार मतांनी पराभूत झाले आहेत. मनूर येथे विजय उमेदवार असे, प्रभाग-१ ज्योती प्रकाश बिजागरे, शोभा संतोष सोनवणे, प्रभाग-२ मध्ये पाटील राजेश नवलाख, देवकर लताबाई सुभाष, गजानन कडू शेळके, प्रभाग-३ मध्ये पाटील सागर प्रभाकर, पाटील लताबाई नीना, पाटील मीनाबाई विजय, प्रभाग-४ मध्ये पाटील शरद माणिकराव, बोदडे चंदू आनंदा, चावरे अश्विनी भागवत.