‘लसीकरणाशिवाय पर्याय नाही. राज्याची तिसऱ्या लाटेकडे वाटचाल होत असून, तिसऱ्या लाटेला थोपवयाचे असेल; तर लस हाच एकमेव पर्याय आहे. यापुढे नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल. गर्दी टाळण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाला वेळप्रसंगी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात,’ अशा स्पष्ट इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिला.
राज्यात मुंबई, ठाणे आणि पुणे या तीन प्रमुख शहरांत करोनाचा प्रादुर्भाव तुलनेने अधिक आहे. शिवाय ही शहरे आणि त्यांच्या परिसरात होत असलेला ओमायक्रॉन आणि करोनाचा प्रसार पाहता, त्या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, राज्यातील इतर भागांमध्ये तशी परिस्थिती नाही. अन्य भागांत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पण, रुग्णसंख्येत वाढ झाल्यास भविष्यात शाळा बंद होऊ शकतात, असे संकेतही टोपे यांनी दिले आहेत.
काही अनावश्यक गोष्टींमुळे संसर्ग वाढत आहे. ज्या गोष्टींमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे, त्यावर बंदी आणली जाईल. वेळोवेळी करोनास्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. आवश्यकता वाटल्यास मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्बंध अधिक कडक केले जातील. नागरिकांनी करोना नियमांचे काटेकोर पालन करावे. बाहेर पडताना मास्क घालावा. गर्दी टाळावी, घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. करोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बर्गर, पिझ्झासाठीही लस बंधनकारक
राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण वेगाने करण्यात येत आहे. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचे असेल, तर लसीकरण करून घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला, तरी लस बंधनकारक आहे. त्यामुळे लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केले आहे.
…
१,१७,१००
देशातील दिवसभरातील नवे रुग्ण
४०,९२५
राज्यातील दिवसभरातील नवे रुग्ण